मुंबई : गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात येणाऱ्या दंडाबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. बुधवार, ३० जुलै रोजी महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. नव्या नियमावलीनुसार गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास, मुंबई महापालिकेने १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत असलेल्या नाराजीची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा सण आहे. सर्वांनाच हा सण जल्लोषात साजरा करता यावा यासाठी आम्ही तत्पर आहोत. मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात आलेल्या दंडाबाबत गणेश मंडळांच्या असलेल्या भावना आम्ही जाणतो. त्याबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सी वॉर्डमधील खड्डे भरण्याचे काम येत्या १० दिवसात पूर्ण करावे, असेही त्यांनी सांगितले.