मुंबई : राजकारणात ’शब्द’ पाळण्यासाठी परिचित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadanvis ) यांनी कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेला शब्दही पाळला आहे. पीडितेच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन देवाभाऊ रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी तिच्या भगिनीच्या विवाहाला पोहचले. या घटनेला आठ वर्षे उलटूनदेखील देवाभाऊंनी पीडित कुटुंबीयांची साथ सोडलेली नाही, हे विशेष.
दि. १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेला न्याय देण्याची हमी घेतानाच, कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. पुढे दि. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी या प्रकरणातील तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
या घटनेला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही फडणवीसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची साथ सोडलेली नाही. पीडितेच्या वडिलांशी त्यांनी कायम संपर्क ठेवला. आता पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावत त्यांनी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाकळी हाजी या गावात रविवारी दुपारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. त्याला फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी हजेरी लावली.
शब्दाचे पक्के मुख्यमंत्री : प्रविण दरेकर
कोपर्डीत आठ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द दिला होता. आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशीर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा. या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.