पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!
राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
04-Dec-2024
Total Views | 59
मुंबई : देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मिळून सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले. त्यानंतर गुरुवार, ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महायुतीच्यावतीने आम्ही राज्यपाल महोदयांना पत्र दिले आहे. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरीता आम्ही दावा केला आहे. राज्यपाल महोदयांनी आम्हाला ५ तारखेला संध्याकाळी ५.३० वाजताची वेळ शपथविधीसाठी नेमून दिली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचे पत्र आम्ही दिले आहे."
"शिवेसनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिले असून महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करण्याची विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनीसुद्धा त्याच आशयाचे पत्र दिले आहे. या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथविधीसाठी निमंत्रित केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे," असे त्यांनी सांगितले.
शपथविधी किती लोकांचा?
ते पुढे म्हणाले की, "किती लोकांचा शपथविधी होणार, याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. आम्ही सगळे निर्णय एकत्रितपणे घेणार आहोत. मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद ही आमच्यासाठी एकप्रकारे तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिघेही आजपर्यंत एकत्रितपणे निर्णय घेत आलो आहोत आणि यापुढेही घेऊ. मी स्वत: काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली. त्यांचा मला सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू. आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राला एक चांगले सरकार देऊ," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.