उज्ज्वल निकम मांडणार कल्याणमधील पीडितेची बाजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश

    28-Dec-2024
Total Views | 33

cm devendra fadnavis
 
मुंबई : (Adv. Ujjwal Nikam) कल्याण पूर्व परिसरात एका १२ वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेची बाजू मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पीडितेच्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि न्याय मिळावा अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देतानाच, दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली.
 
पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. ते म्हणाले की, कुटुंबाने घाबरण्याची गरज नाही. त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगार यापुढे तुरुंगातून बाहेर येणार नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल याचीही खात्री त्यांनी दिली. या बैठकीनंतर अमरजीत मिश्रा म्हणाले, 'ही बाब केवळ एका कुटुंबाची नाही, तर मुलींच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी वकिलाची मुख्यमंत्र्यांनी केलेली नियुक्ती आणि ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश हे न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, अमरजीत मिश्रा यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. विजय उपाध्याय, आयपी मिश्रा, सीपी मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121