मुंबई : कल्याणमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
याप्रकरणात आरोपींना जामीन मिळणार नाही व कठोर शिक्षा होईल यासाठी आवश्यक सर्व पुरावे सादर करावेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच सरकारच्यावतीने निष्णात अभियोक्त्यांची नियुक्त करावी. सीसीटीव्ही व पुरावे तपासून घ्यावेत. बाधित कुटुंबास तत्काळ मदत करून समुपदेशन करावे. त्याचबरोबर लहान मुलींचे अपहरण, अत्याचार रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यात यावा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.
२३ डिसेंबरच्या संध्याकाळी १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यानंतर ठाणे ग्रामीण पडघा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला. २४ डिसेंबर रोजी पोलिसांना कल्याणजवळच्या बापगाव याठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला.