हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने ओळखला जाणार
02-Dec-2024
Total Views | 33
1
लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या रसुलाबाद घाटाचे ( Rasulabad Ghat ) नाव बदलण्यात आले आहे. हा घाट आता ’चंद्रशेखर आझाद घाट’ या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून प्रयागराज महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा औपचारिक आदेश आठवडाभरात जारी करून तेथे नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार आहे.
रसुलाबाद घाट गंगा नदीच्या काठावर आहे. या घाटावर दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळेच या घाटाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महानगरपालिकेने घाटाला नवीन नाव देण्याची सुरुवात १९९१ साली हाती घेतली होती. १९९१ साली महापालिका सभागृहाने नामकरणाचा ठराव केला होता. मात्र, ३३ वर्षांपूर्वीचा प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप कोणताही औपचारिक आदेश काढण्यात आलेला नव्हता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दि. २७ नोव्हेंबरला प्रयागराज दौर्यावर होते. दौर्यात त्यांनी महापालिकेलाही भेट दिली. महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडला होता. मुख्यमंत्री योगी यांनी महापौर गणेश केसरवाणी आणि महापालिका आयुक्त चंद्र मोहन गर्ग यांना याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने तत्काळ कार्यवाही करत रसुलाबाद घाटाला हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.