संघटनपुरुष पू. बाळासाहेब देवरस

    10-Dec-2024
Total Views | 48
 
Balasaheb Deoras
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस यांचे संघटनकौशल्य हे सर्वस्वी वादातीत. प. पू. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींनंतर बाळासाहेबांनी संघाच्या प्रत्येक निर्णयात संघटन कार्यपद्धती कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला. आज बाळासाहेब देवरस यांची जयंती. त्यानिमित्ताने या संघटनपुरुषाच्या गुणवैशिष्ट्यांचे हे चिंतन...
 
मधुकर दत्तात्रेय तथा बाळासाहेब देवरस हे मी जवळून अनुभवलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले पू. सरसंघचालक. संघ स्वयंसेवक हीच त्यांची ओळख असल्याने वरकरणी ते स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसलेले सरसंघचालक होते. डॉ. हेडगेवार हे संघाचे संस्थापकच होते. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजेच संघ होता, तर परमपूजनीय श्रीगुरूजी यांच्याभोवती अध्यात्मिक तेजाचे वलय होते. त्यामुळे त्यांचे वेगळेपण सहज लक्षात येत असे. पण, पू. बाळासाहेबांच्या बाबतीत वेगळे असे काहीच नव्हते.
 
या पार्श्वभूमीवर पू. बाळासाहेब देवरस यांनी श्रीगुरुजींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा सांभाळली व त्यांचे वेगळेपण लक्षात येऊ लागले. सतत संघटनेचे चिंतन केले व संघटनेचे चिंतन करायचे म्हणजे प्रमुख्याने काय करायचे, याचा संपूर्ण वस्तुपाठच दिला. संघटना ‘ध्येयवाद’ व ‘कार्यपद्धती’ या दोन चाकांवर चालते व ते दोन्ही पाय समान शक्तीने, समान गतीने क्रियाशील असले पाहिजेत, हे त्यांनी समजून घेतले व तसे संघटन बनवले. संपूर्ण संघटना कालोचित बनवली आणि संघटनेच्या कार्यात लवचिकपणासुद्धा आणला. हे करताना संपूर्ण संघटना धगधगती व संवेदनशील ठेवली.
 
१९७७ साली आणीबाणी हटली आणि नंतरच्या राजकीय निराशाजनक परिस्थितीत संघ शाखांच्या वाढीचा वेगदेखील अतिशय मंदावला. शाखेच्या वातावरणातील तारूण्यसुलभ मुसमुसलेपण कोठे तरी हरवले होते. शाखेची कालोचितता हरवल्यासारखे कुठे तरी वाटत होते व हे संघटन प्रमुख म्हणून बाळासाहेब देवरस यांनाही जाणवत होते. सर्वंकष परिवर्तन हे शाखेसारख्या कार्यपद्धतीतून व्यवहार्य आहे का, याविषयी सर्वत्र एक अबोल संभ्रम होता. अशा परिस्थितीत या संघटनपुरुषाची खरी ओळख कार्यकर्त्यांना झाली.
 
त्यातील पहिली गोष्ट त्यांच्या विचार करण्यामुळे समजली. ती म्हणजे, मर्यादा लपवायची नाही तर स्वीकारायची आणि त्यावर मात करण्यासाठी योजना आखायची. कधीच खोट्या समाधानात वावरायचे नाही. लगेचच या चिंताजनक विषयासाठी अखिल भारतीय स्तरावर एक कार्यकर्ता गट नेमला गेला. शाखा प्रभावी करण्यासाठी काय करता येईल, हे तो गट समजून घेऊ लागला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून मदनदासजी देवी यांनी मते जाणून घेतली. ध्येयवादातील आक्रमकता जागी होईल अशा कार्यक्रमांची रचना करणे आवश्यक आहे, असे मत मी मांडले. अशी असंख्य मते गोळा झाली असतील, त्यातील काही प्रत्यक्षात आणण्याचे ठरले असणार. कारण, त्याची परिणामकारकता दिसून आली. त्यावेळी झालेल्या एका बैठकीतील पू. बाळासाहेब देवरस यांचे एक वाक्य मला नीट आठवते की, “शाखेत लागणारा भगवा ध्वज व शेवटी होणारी प्रार्थना या दोन गोष्टी कायम ठेवून शाखेत कोणताही नवीन प्रयोग करा. पण, शाखा प्रभावी करून दाखवा.”
 
पू. बाळासाहेब देवरस यांचे हे चिंतन कार्यकर्त्यांसाठी एक आव्हान, आवाहन व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधी होती. खेड्यातील बालशाखेवर नित्य-नियमित काम करू न शकणारे मुख्य शिक्षक या समस्येला पर्याय म्हणून तरूण व्यावसायिकांची रात्र शाखा हा पर्याय मला वापरता आला. तरूण व्यावसायिकांसाठी ‘अखंड भारत स्मरण दिन’ हा ध्येयवाद स्मरणासाठी स्वीकारता आला. सायकल सहलीतून प्राथमिक शिक्षा वर्ग घेता आला. नगर जिल्ह्यात १०० गावी दैनिक शाखा लावता आल्या. हजारो कार्यकर्त्यांना आव्हान पेलण्यासाठी नेतृत्वाचे जे कणखर कवच मिळाले, ते नेतृत्व म्हणजे पू. बाळासाहेब देवरस. संघाच्या शाखा कार्यपद्धतीला लवचिक व कालोचित बनवले. कोणतीही खळखळ व खळबळ येऊ न देता.
 
संकट स्वीकारले, आव्हान स्वीकारले, त्यावर उत्तर शोधून आणि मात करूनच थांबले. त्यांनी संघटन तर वाढवलेच. पण, समाजाभिमुख करून संघर्षक्षम करून दाखवले. मग, अयोध्या आंदोलन असो, वा देशात दिसलेले सर्वंकष राजकीय परिवर्तन असो, त्याच्या पायाचे दगड म्हणजे समाजाभिमुख शाखा आणि संघाचे स्वयंसेवक. पू. बाळासाहेब देवरस यांच्या कालोचित व कणखर नेतृत्वातूनच झालेली ही निर्मिती!
 
संघात एकचालकानुवर्तित्व आहे. म्हणजे, हुकुमशाही आहे, असे वाटणार्‍या कुणालाही वरील उदाहरणांवरून लक्षात येईल की, संघातील व पू. बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वातील लोकशाही किती प्रगल्भ होती. संघ कालोचित राहिला. कारण, लोकशाहीचा प्रगल्भ परिचय त्यांनी समाजाला व स्वयंसेवकांना करून दिला. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचे हे प्रसिद्ध वाक्य आहे, जे संघटनेची खरी ताकद आहे. ते वाक्य होते, “आणीबाणीत एक सरसंघचालक गजाआड असले, तरी दहा सरसंघचालक बाहेर होते.” ‘सहनेतृत्व’ याचा अर्थ त्यांच्या कृतीतून शिकायला मिळाला की, संघटना एकसंघपणे का चालते? तर या सामूहिक नेतृत्वातून चालते व उदाहरण फक्त संकटकाळातील आहे असे नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुखपद स्वीकारल्या नंतर संघाची सामाजिक विषयावरील भूमिका समाजासमोर व स्वयंसेवकांसमोर नीट व कालोचित तसेच सोपेपणाने पोहोचावी म्हणून त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध ‘वसंत व्याख्यानमाले’त एक विषय मांडला. तो म्हणजे ‘सामाजिक समता व हिंदू संघटन.’ त्या विषयाची व्याप्ती खूप आहेच. पण, या ठिकाणी मला त्यातील संघटन वैशिष्ट्याच्या पैलूचा विचार करायचा आहे. त्यांनी हे लिखित भाषण आधी संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पाठविली. मते जाणली व नंतर ते भाषण केले. सामाजिक विषय हे क्लिष्ट असतात. त्यात भूमिका ही नीट तोलून मापून पण, संघटनेतील सर्वांना पचली सुद्धा पाहिजे. संघटनेला कालोचित दिशा देताना हे अत्युच्च महत्त्वाचे असते. हे बाळासाहेब देवरस यांनी कृतीतून सिद्ध केले.
 
सरसंघचालक क्रियाशील राहू शकणार नसेल, तर त्यांने स्वतः होऊन पदावनत व्हावे, हे त्यांनी स्वत:च्या कृतीने शिकवले. संघाच्या उत्सवात डॉक्टर, श्रीगुरुजी व छत्रपती शिवाजी महाराज या तीनच प्रतिमा असतात. तिसर्‍या सरसंघचालकांची नसणार हे त्यांनी स्वत:च सांगितले.
 
संघटन गतानुगतिक होता कामा नये, हे त्यांनी प्रत्येक कृतीतून सिद्ध करून दिले. मग ती कार्यपद्धती असो वा ध्येयवाद. सामाजिक प्रश्नांवर जागरण कसे असावे, धार्मिक भूमिका कालोचित कशा असाव्यात, संघर्ष कसा व सार्वत्रिक असावा, राजकीय भूमिका कशा घेतल्या गेल्या पाहिजेत, प्रत्येक निर्णयात संघटन कार्यपद्धती काय असावी, हे संघटन बाळासाहेब देवरस यांनी बारकाईने शिकवले.
 
तसे तर पू. बाळासाहेब देवरस यांची प्रत्येक कृती एक ग्रंथ निर्माण करेल. पण, आज या एका महत्त्वाच्या गुणाभोवती व संघाच्या कार्यातील त्यांच्या सर्वोत्कृष्ट देणगीसाठी नतमस्तक होऊन त्यांचे स्मरण करतो.
 
सुनील देशपांडे 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121