फसव्या घोषणा देणाऱ्या मविआचे खोटे मुखवटे जनताच उतरविणार
भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकरांना विश्वास
06-Nov-2024
Total Views | 29
1
पुणे - ( Pravin Darekar ) महाविकास या बेगडी नावाचा मुखवटा घेऊन महाराष्ट्र भकास करणारे, वचननामा असे गोंडस नावं देत खोट्या आश्वासनांनी महाराष्ट्राची फसवणूक करणारे आणि हिंदुत्वाच्या नावाने गजर करत हिरवी झुल पांघरून मुस्लिमांचा लाळघोटेपणा करणारे नेते आता पुन्हा त्याच फसव्या आश्वासनांची पोतडी घेऊन मैदानात उतरले आहेत त्यांचे खोटे मुखवटे जनताच उतरविणार, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच विकासाला गती देणाऱ्या महायुतीच्या विजयाचा झेंडा आता महाराष्ट्रावर फडकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
आज पुण्यातील भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्र माध्यम केंद्र, भारत भवन, शुक्रवार पेठ, नातूबाग येथे आमदार प्रविण दरेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्राचे माध्यम प्रमुख अमोल परिडकर, पुणे जिल्ह्याचे माध्यम प्रमुख संजय मयेकर यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दरेकर यांनी निवडणुका आल्या की घराबाहेर पडून आश्वासनांची आणि घोषणांची आतिषबाजी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अडीच वर्ष महाराष्ट्राचा विकास रोखून का धरला? शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने का पुसली? उद्योजकांकडून खंडणी वसुल का केली? कोरोना काळात सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून आरोग्य सेवेतही भ्रष्टाचाराचा मलिदा का खाल्ला? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जुनीच फसवी घोषणा आज उद्धव ठाकरे देत आहेत, पण सत्ता होती तेव्हा शेतकऱ्याला साधी वीजबिल माफीदेखील का दिली नाही? वादळग्रस्त शेतकऱ्याला मदत पोहोचलीच नाही याची जाहीर कबुली देणाऱ्या ठाकरेंना पुन्हा फसव्या घोषणा देताना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी, अशा शब्दांत दरेकर यांनी खडेबोले सुनावले.
दरेकर पुढे म्हणाले की, आता राज्यातील अडीच कोटी महिलांच्या संसाराला लाडकी बहीण योजनेमुळे हातभार लागला आहे. पण त्या योजनेविषयी खोट्या कंड्या पिकवून महिलांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा समाजविरोधी कट महाविकास आघाडीने शिजवला असल्याचा आरोपही आमदार दरेकर यांनी केला. त्याचबरोबर अडीच वर्षाच्या सत्ताकाळात महिला, युवक, शेतकऱ्यांसाठी काही योजना आखणे दूरच उलट त्यांच्या हितासाठी अगोदरच्या फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजना बंद करून शुद्र राजकारणापायी ज्यांनी जनतेची कोंडी केली तेच आता पुन्हा खोटी आश्वासने देत राज्यातील जनतेला फसवू पाहत आहेत. आजही विकासाला विरोध, जनहिताच्या योजनांना विरोध, भ्रष्टाचाराची पाठराखण, हिंदुत्वाच्या विरोधातील शक्तींना पाठिंबा हाच महाविकास आघाडीचा कार्यक्रम असून ही आघाडी सत्तेवर आल्यास राज्यातील मोक्याच्या जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्यासाठी मदत करून बहुसंख्य हिंदूंना वाऱ्यावर सोडेल, असेही दरेकर म्हणाले.
तसेच महाविकास आघाडीने सत्ता बळकवून जनतेचा विश्वासघात केला पण त्या काळात नाकर्तेपणा दाखवून घरकोंबड्या प्रमाणे मलिदा ओरबडण्यासाठी सत्ता राबविली. त्यांचा अडीच वर्षाचा निष्क्रिय सत्ताकाळ आणि महायुतीच्या सव्वा दोन वर्षाचा गतिमान विकास यातून योग्य ती निवड करणाऱ्या समंजस जनतेने आता पुन्हा महाविकास आघाडीच्या जाळ्यात फसू नये, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
...तर मविआला किंमत मोजावी लागेल
दरेकर म्हणाले की, फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याची महाविकास आघाडीच्या कुटील नीतिस लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनता बळी पडली, पण आता तो फसवा प्रयोग पुन्हा करून जनतेला गृहीत धरण्याचे धाडस केले तर महाविकास आघाडीला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दरेकरांनी दिला.