‘मविआ’च्या काळात भगव्याला विरोध, हिरव्याचे लांगूलचालन
05-Nov-2024
Total Views |
2
मुंबई : ( MVA) मतांसाठी आश्वासनांची खैरात वाटणारे अनेक नेते आजवर पाहिले. परंतु, विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी स्वधर्मातील सणांवर बंदी आणणारे नेतृत्त्व महाराष्ट्राने पहिल्यांदाच अनुभवले. महाविकास आघाडी आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याने अडीच वर्षांच्या कार्यकाळात हिंदू धर्मीयांच्या सणांमध्ये ना ना प्रकारे विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला. दिवाळीला विरोध, शिव जयंतीला विरोध, कोरोनाचे कारण पुढे करून मंदिरांचे दरवाजे बंद. पण, त्याच काळात विशिष्ट धर्मीयांना सवलत देण्यात आली. त्यामुळे ठराविक व्होट बँकेला खुश ठेवण्यासाठी हिंदू धर्मीयांच्या हक्कांवर गदा आणणार्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे अवघे विश्व थांबले असले, तरी पुढच्या काही महिन्यांत टाळेबंदी उघडून व्यवहार पूर्वपदावर आणण्यात आले. अशावेळी प्रार्थनास्थळेही बंधमुक्त करण्याची आवश्यकता असताना, मविआ सरकारने त्यात आडकाठी आणली. कोरोनाचे कारण पुढे करून हिंदू मंदिरे उघडण्यास विरोध केला. गुढीपाडवा, दिवाळी, गणेशोत्सव असे मोठे सणदेखील साजरे करण्यास बंदी घालण्यात आली. त्याचवेळी, एका विशिष्ट समुदायातील लोकांच्या सणांसाठी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव राज्यात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये कोरोनाच्या नावाखाली शिवजयंतीला ‘कलम १४४’ लागू करण्यात आले. मात्र, दररोज दिवसाला तीनवेळा हजारोंच्या संख्येने एकत्र येणारा एक विशिष्ट समुदाय त्यांच्या नजरेतून सुटला. व्होट बँक जपण्यासाठीच ही सवलत देण्यात आली होती, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. सत्तेपायी हे धर्म बदलायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत, अशीच आजची स्थिती आहे. त्यामुळे आपण असल्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्र सोपवणार आहोत का, याचा विचार मतदारांनी करण्याची वेळ आली आहे.
दिवाळी साजरी केल्यास पोटात दुखते
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण. राज्यभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मनसेच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवर भव्य रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, उबाठा गटाने आचारसंहितेचे कारण पुढे करत त्यावर आक्षेप घेतला. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण, दिवाळीऐवजी ईदसाठी रोषणाई केली असती आणि हिरवे कंदील लावले असते, तर उबाठाने विरोध केला असता का?
‘देवाभाऊं’मुळे भगिनींची दिवाळी गोड
महाविकास आघाडीच्या लांगूलचालनामुळे माजलेल्या कट्टरपंथींनी दिवाळीला उन्माद सुरू केला आहे. तळोजा सेक्टर-९ मधील पंचानंद सोसायटीच्या आवारात दिवाळीनिमित्त सजावट आणि रोषणाई करण्यास काही कट्टरपंथींनी विरोध केला. तसेच, कंदील लावणार्यांना धमकी देण्यात आली. स्थानिक हिंदू भगिनींनी त्याचा जोरदार निषेध नोंदवला. लाडके ‘देवाभाऊ’ (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) त्यांच्या मदतीला आले आणि या भगिनींची दिवाळी गोड झाली. या प्रकरणात अशफाक सिद्दीकी आणि त्याच्या कट्टरपंथी भावांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोसायटीच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे.