नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी जस्टिन ट्रूडो सरकार ( Trudeau government ) बॅकफूटवर आले आहे. कॅनडाच्या सरकारने निज्जर हत्याकांडात पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांचा कोणताही संबंध किंवा पुरावा नसल्याचे मान्य केले आहे. ट्रूडो सरकारने हा आरोप करणाऱ्या कॅनडाच्या प्रसारमाध्यमाचा दावा फेटाळून लावला आहे.
कॅनडातील ग्लोब अँड मेल या वृत्तपत्रातील वृत्तात कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते की, निज्जर यांच्या हत्येचा कट भारताला माहिती होता. यामध्ये भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि एनएसएस यांचाही सहभाग असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, ट्रूडो सरकारने आता या वृत्तापासून हात झटकले आहेत.
कॅनडाच्या वृत्तपत्रातील वृत्ताविषयी जस्टिन ट्रूडो सरकार म्हणाले, 'कॅनडा सरकारने हे विधान केलेले नाही किंवा पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्री जयशंकर किंवा एनएसए अजित डोवाल यांचा कॅनडातील गंभीर गुन्हेगारी कारवायांशी संबंध जोडणारा कोणताही पुरावा त्यांना माहिती नाही. हा अहवाल केवळ अनुमानावर आधारित असून चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.