उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सुनील केदारांनी दादागिरीचे राजकारण केले
18-Nov-2024
Total Views | 52
नागपूर : सावनेरमधील अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. सुनील केदार यांच्या कार्यकाळात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण झाले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सावनेर येथील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला. वेगवेगळ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे केली. नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघ येतात. यातील सावनेर हा सर्वात मागास राहिलेला मतदारसंघ आहे. कारण इथल्या आमदारांना माहिती होते की, मी विकास केला तर लोकं प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांना दाबून ठेवलं. इथे विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण झाले."
"सुनिलबाबूंनी इथे सट्याचा, पट्याचा, रेतीचा, चोरी चकारीचा रोजगार दिला. चांगल्या घरच्या पोरांना कामाला लावून त्यांचे जीवन खराब करण्याचे काम इथे झाले. त्यामुळे आज इथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होताना दिसत आहेत. माझ्या पोलिसांना या कामांचा सर्वात जास्त त्रास सावनेर मतदारसंघात आहे. कारण या धंद्यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे. परंतू, हे कुठेतरी संपवायला हवे. नागपूर जिल्हा विकासाकडे जात असेल तर सावनेरही विकासासोबत गेला पाहिजे. त्यामुळे ज्याला विकास काय आहे हे समजते असा लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला हवा," असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, "ज्या जिल्ह्यांच्या जिल्हा बँका जीवंत आहेत तेच जिल्हे राज्यात पुढारले. पुणे, सातारा इथली जिल्हा बँक स्वत:च्या भरवशावर शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत कर्ज शेतकऱ्याला देते. यासोबतच कारखान्याला १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊन मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रातले कारखाने उभारते. पण नागपूरची अवस्था काय आहे? आपली जिल्हा बँक मेली. त्यासोबतच आपला शेतकरी आणि खातेदारांची स्वप्नेदेखील मेली. या जिल्ह्यात कृषी आधारीत अर्थव्यवस्था पूर्णपणे संपली. या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे? गरीबाच्या हक्काचे हे शेकडो कोटी रुपये घेऊन बँकेचा घोटाळा कुणी केला?" असा सवालही त्यांनी केला.
"आपल्या सगळ्या लोकांनी यासाठी आंदोलन केले. त्यामुळे इतक्या वर्षानंतर का होईना पण आमची बँक बुडवल्याबद्दल सुनील केदार यांना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि आज ते जामीनावर बाहेर आहेत. पुढचे पाच वर्षे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. पण आता त्यांनी वहिनींना समोर केले. समजा त्या निवडून आल्या तर आमदार म्हणून त्या काम करतील की, सुनीलबाबू करतील? त्यामुळे उद्या इथे काँग्रेसचा आमदार निवडून आल्यास सुनील केदारच तुमच्या डोक्यावर बसून चक्की दळेल. त्यामुळे परिवर्तनाची हीच ती वेळ आहे," असे आवाहन फडणवीसांनी केले.
महायूतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ!
"ही माझी शेवटची सभा आहे. मी जवजवळ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. महाराष्ट्रात २३ तारखेला पुन्हा एकदा महायूतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सावनेरमध्ये परिवर्तनाची यापेक्षा मोठी संधी पुन्हा मिळणार नाही. आता चुकलात तर पश्चाताप करण्याशिवाय काहीही हातात राहणार नाही. इतके वर्ष सुनिलबाबू या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांच्या या कार्यकाळात सावनेर मतदारसंघाची काय अवस्था आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही," असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.