भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

    15-Nov-2024
Total Views | 39
Harishchandra Chavan

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ( Harishchandra Chavan ) यांचे गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती मागील अनेक दिवसांपासून अत्यवस्थ होती. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निधनानंतर भाजपसह विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथील कॉलेज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. विज्ञान शाखेचे पदवीधर असणारे चव्हाण आधी काँग्रेसमध्ये होते. प्रतापगड ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

जिल्हा परिषद सदस्य आणि सलग १५ वर्षे त्यांनी समाजकल्याण सभापती म्हणून काम केले. १९९५ मध्ये सुरगाणा-पेठ मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. पुढील काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावले. पण विधानसभेत ते पराभूत झाले. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये तत्कालीन मालेगाव लोकसभा मतदारसंघातून ते भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा खासदार झाले. पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ साली ते निवडून आले. २०१९ मध्ये भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121