संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज्यातील व्यापारी वर्गात संतापाची लाट
राज्यभरातील व्यापारी वर्गातून राऊतांच्या माफीची मागणी
13-Nov-2024
Total Views | 40
1
मुंबई : शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच असून, अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी समस्त व्यापारी वर्गाला लक्ष्य केले आहे. “व्यापारी हा कायम खोटे बोलत असून, तो ग्राहकाला फसवतो” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण व्यापारी वर्ग संजय राऊत यांच्या या बेताल वक्तव्यावरून नाराज झाला आहे.
काश्मीरच्या मुद्यावर अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, संजय राऊत यांनी संपूर्ण व्यापार्यांना लक्ष्य केले. व्यापारी जसा ग्राहकांची फसवणूक करतो, भेसळ करतो, असे म्हणत अमित शाहंवर टीकास्र डागले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरातील व्यापारी वर्ग दुखावला गेला असून, संजय राऊतांनी व्यापार्यांचा अपमान केल्याची भावना या वर्गात आहे. या वक्तव्यावर संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांचा बेतालपणा उबाठाला भोवण्याची शक्यता आहे.
व्यापार्यांना चोर म्हणून अवहेलना करू नका.
संजय राऊत यांना माझे सांगणे आहे की, तुमचे राजकीय दुकान खोटे बोलून चालत असेल. पण, आमचा व्यापार हा सचोटीवर आणि सत्यावर चालतो. रोज सकाळी उठून बडबड करण्यापेक्षा राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संजय राऊत यांनी काम करावे. व्यापारी सरळ मार्गाने आपला व्यापार करत असताना ‘ग्राहक देवो भवः’ या न्यायाने आपला व्यवसाय करत असतात. तुम्ही मात्र जनतेला, व्यापार्यांना चोर समजून अवहेलना करत असतात, याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.
प्रदीप पेशकार, प्रदेश प्रभारी-उद्योग आघाडी, भाजप
राऊतांचे वक्तव्य निंदास्पद आणि संतापजनक!
व्यापार्यांना चोर म्हणणारे संजय राऊत यांचे हे स्वानुभवाचे बोल आहेत. राऊतांचे वक्तव्य हे निंदनीय असून, राजकारणासाठी समस्त व्यापारी वर्गाची अवहेलना करण्याची गरज त्यांना नव्हती. महाराष्ट्रात सर्व जातीतील व्यापारी वर्ग प्रामाणिकपणे त्यांचे त्यांचे काम करतो. ग्राहकाला तो देव मानतो. देव समजूनच त्यांना दर्जेदार वस्तू आणि सेवा देत असतो. लॉकडाऊन काळात व्यापार्यांनीच सर्व घटकांना मदतीचा हात दिला. त्यामुळे संजय राऊत यांचे वक्तव्य हे निंदास्पद असून संतापजनक आहे. संजय राऊत स्वत: संपादक असून, त्यांचेही वर्तमानपत्र बाजारामध्ये विक्रीला असते. त्यामुळे स्वानुभवावरून त्यांनी असे बेताल वक्तव्य केलेले असू शकते. मात्र, शिवसेना उबाठा गटातील व्यापार्यांसहित इतर कोणत्याही व्यापारी वर्गाला ही टीका लागू नाही, हे निश्चित. वास्तविक माफीची अपेक्षा आहेच. पण, त्यांचा स्वभाव पाहता ती अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता धुसर.