मुंबई : राज्याच्या सत्ता सिंहासनावर पुन्हा एकदा महायुती ( Mahayuti ) विराजमान होईल, असा अंदाज मतदानपूर्व कलांमधून वर्तवण्यात आला आहे. ’आएएनएस आणि मॅट्रिझ’च्या ओपिनियन पोलनुसार, ४७ टक्के मतांसह महायुती बहुमताने विजयी होईल, तर महाविकास आघाडीला पुन्हा विरोधी बाकांवर बसण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण केल्यानंतर ’आएएनएस आणि मॅट्रिझ’ने सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी मतदानपूर्व कल जाहीर केले. त्यानुसार, प्राप्त परिस्थितीत १४५ ते १६५ जागा मिळू शकतील, तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागांवर समाधान मानावे लागेल. मतांच्या टक्केवारीत सांगायचे झाल्यास महायुतीली ४७ टक्के, तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळलीत. इतर छोट्या पक्षांना १२ टक्के मते मिळू शकतील. मात्र, सर्व छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून ५ हून अधिक जागांच्या पुढे जाऊ शकणार नाहीत, असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.