ठाकरेच नव्हे, नड्डा आणि शाह यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी
12-Nov-2024
Total Views | 36
नवी दिल्ली : मानक कार्यप्रणालीचा (एसओपी) भाग म्हणून केवळ उबाठाप्रमुख उध्दव ठाकरेच नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचीही विमाने आणि हेलिकॉप्टर तपासले ( Helecopter Checking ) गेले होते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वादंग निर्माण झाला आहे. ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यासोबत अरेरावीचीही भाषा वापरल्याचे त्यांनीच काढलेल्या व्हिडीओद्वारे स्पष्ट झाले आहे.
त्याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, सर्व राजकीय पक्षांना समान संधी प्राप्त व्हावी यासाठी कठोर एसओपीचे पालन करण्यात येते. यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हेलिकॉप्टर २१ एप्रिल तर भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे २४ एप्रिल रोजी तपासण्यात आ होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विधानाची आठवण करून दिली. चालू विधानसभा निवडणुकीच्या घोषणेदरम्यान सर्व नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.