शिवराय-रामदास स्वामी प्रकरणावरुन विरोधकांचा जातीयवादी अपप्रचार!
अमित शाह यांच्या विधानाचा विपर्यास; ऐतिहासिक पुराव्यांकडे कानाडोळा
10-Nov-2024
Total Views | 39
मुंबई : ( BJP ) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा शिराळा येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अमित शाह यांनी शिराळ्याच्या भूमीचा उल्लेख, ‘समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी’ असा करताना, “गुलामीच्या काळात समर्थ रामदास स्वामींनी तरुणांचे संघटन बांधून छत्रपती शिवरायांना पाठिंबा देण्याचे कार्य केले,” असे त्यांनी भाषणात म्हटले. शाह यांच्या याच विधानाचा विपर्यास करत विरोधकांनी त्यांचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी, जातीयवादी संघर्षाची विषपेरणी केली आहे.
अमित शाह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “रामदास स्वामींनी छत्रपतींच्या सोबत तरुणांना उभे केले असे सांगून, शिवाजी महाराजांपेक्षा रामदास स्वामी मोठे होते असे दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे,” असा जावईशोध लावला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही “अमित शाह यांना छत्रपतींनी सुरत लुटला याचा राग असून, म्हणूनच समर्थ रामदासांचा संबंध शिवछत्रपतींशी जोडून भाजप शिवरायांचा अपमान करत आहे,” असा बादरायण संबंध जोडला. तसेच अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर पुरोगामी पिल्लावळीलादेखील प्रचंड मळमळ झाली असून, त्यांनी शाह यांच्यावर टीका करताना समर्थ रामदासांवरही विखारी टीका केली आहे.
मुळातच ‘समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नाहीत’ अशी भूमिका महाराष्ट्रातील काही पुरोगामी इतिहासकार वर्षानुवर्षे मांडून, समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा हा विषय चर्चेला येतो, तेव्हा हे तथाकथित इतिहासकार अश्लाघ्य भाषेत समर्थांवर अनेकदा टीका करतात. सर्वसाधारणपणे ही टीका समर्थांच्या जातीवर आधारितच असते. मात्र, इतिहासातही समर्थांचा उल्लेख शिवछत्रपतींचे गुरू असाच करण्यात आला आहे. याकडे हे पुरोगामी सपशेल कानाडोळा करतात.
महत्त्वाचे म्हणजे, महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवरायांवर जो पोवाडा रचला, त्यामध्ये ‘लोकप्रितिकरितां करी गुरू रामदासास राजगडी स्थापी देवीस’ असे असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. मात्र, महात्मा फुले यांच्या विचारांच्या आणाभाका घेणारे पुरोगामी, त्यांच्या या पोवाड्याकडे अगदी सोयीस्कर दुर्लक्ष करतात.
सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील “समर्थ रामदास त्यांचे ठायी मोठे असतील, किंबहुना आहेत. मात्र, शिवरायांच्या संदर्भात त्यांचे नाव जोडले जाते, अनेक जण त्यांना शिवरायांचे गुरू मानतात, हे चुकीचे आहे. शिवरायांच्या गुरु म्हणजे फक्त जिजाऊ आईसाहेबच!” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, आश्चर्य याचे आहे की, करवीरकर छत्रपती शहाजीराजे यांनी लिहून घेतलेल्या ‘छत्रपती ऑफ कोल्हापूर’ या पुस्तकात एका ठिकाणी समर्थ रामदासांचा उल्लेख ‘शिवरायांचे गुरू’ असाच करण्यात आला आहे. असे असूनही संभाजीराजे छत्रपतींनी याविषयी केलेले वक्तव्य हे दिशाभूल करणारेच म्हणावे लागेल. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ, पुरावे आणि इतिहासकारांची मते लक्षात घेता, हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊन, सामाजिक सौहार्दासाठी अशा अपप्रचाराचा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.
लांगूलचालन करणार्या मंडळींना पोटशूळ
जातीयवादी शरद पवार आणि त्यांची टोळी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी, जाती-जातींत वाद पेटवण्याचे कट-कारस्थान रचत असतात. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला कोणीही दिला, तर यांच्या पोटात गोळा येतो. छत्रपती शिवाजी महाराज संतांचा आदर करायचे आणि संत त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायचे, या उदाहरणातून महाराष्ट्रातले संत हिंदुत्ववादी राजसत्तेला बळ देत आलेले आहेत, हा स्पष्ट संदेश जनतेत गेला तर आपले अवघड होईल, या धाकानेच या लांगूलचालन करणार्या मंडळींना पोटशूळ उठला आहे.
-आचार्य तुषार भोसले प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र
समर्थांच्या कार्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवरायांना झाला हे सत्यच!
रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभरात १ हजार १०० मठ स्थापन केले. त्याठिकाणी तरुणांकडून शक्तीची उपासना करून घेतली. त्यामुळे सहाजिकच शक्तीसंपन्न समाजाचा लाभ, शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीसाठी झाला आहे, यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. तसेच, रामदास स्वामी यांनी शिवरायांचे केलेले वर्णन, हे केवळ व्यक्तीला अंतर्बाह्य जाणणारेच करू शकतात, इतके ते अचूक आहे. त्यांच्यातील सालोख्याच्या संबंधाचा तो एक पुरावाच आहे. समर्थ रामदास आणि शिवछत्रपती यांची चाफळ जवळील शिंगणवाडी इथे भेट झाल्याचे पुरावे आज इतिहासाकडे उपलब्ध आहेत.
-सुधीर थोरात, कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ