महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान! शक्तीबॉस नावाची तक्रारपेटीही सुरु करणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

    03-Oct-2024
Total Views | 35
 
Ajit Pawar
 
पुणे : महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरु करण्यात येणार आहे. तसेच शक्तीबॉक्स नावाची तक्रारपेटीदेखील ठेवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी गुरुवारी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन करण्यात येणार आहे. यामध्ये शक्तीबॉस नावाची तक्रार पेटी ठेवणार आहोत. अनेक महिला आणि मुलींच्या अडचणी जसे, मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, फोन करणे असे प्रकार घडतात. मुलींना मनमोकळेपणाने या गोष्टी सांगता येत नाही. त्यामुळे ज्या महिला तक्रार करण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी, यासाठी बारामती परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्यूशन, महिला वसतीगृह, पोस्ट ऑफीस याठिकाणी पोलिसांमार्फत शक्तिबॉक्स ही तक्रार पेटी ठेवण्यात येईल. या पेटीमध्ये तक्रार टाकल्यानंतर पोलिसांकडून दोन दिवसात ती तक्रारपेटी उघडण्यात येईल आणि प्राप्त तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित तक्रारदार व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल."
 
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व!
 
यासोबतच एक शक्ती नंबरही जारी करण्यात येणार आहे. याला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं एक वाक्य दिलं आहे. याद्वारे 9209394917 या नंबरवर कॉल करता येईल. या क्रमाकांची सेवा २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर फोन किंवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचे त्वरित निवारण करण्याबाबत आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. हा मोबाईल क्रमांक बारामतीतील शाळा, कॉलेज, सरकारी आणि खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पीटल याठिकाणी लावून आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे किंवा छेडछाडीचे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो, व्हिडीओ किंवा लोकेशन शेअर केल्यास तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात येईल.
 
शक्ती कक्ष!
 
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि प्रत्येक पोलिस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यात दोन महिला पोलिसांची नियूक्ती करण्यात येणार आहे. या कक्षात महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देत त्यांना विश्वासात घेऊन तक्रारींचं निराकरण करण्यात येईल. तसेच त्यांना मार्गदर्शनही करण्यात येईल.
 
शक्ती नजर!
 
सोशल मीडिया जसे व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबूक पोस्ट, इन्स्ट्राग्राम यावर अल्पवयीन मुलेमुली किंवा इतर व्यक्ती शस्त्रे, बंदूक, चाकू किंवा इतर धारदार वस्तूंसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात. त्यावर आता पोलिसांच्या पथकांची नजर राहणार आहे. असे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
 
शक्ती भेट!
 
यामध्ये शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, खाजगी कंपन्या, हॉस्पीटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतीगृह इत्यादी ठिकाणी भेटी देऊन तिथल्या महिला आणि मुलींना महिलांविषयीचे कायदे, गुड टच-बॅड टच, व्यसनाधिनता, वाढती बालगुन्हेगारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाईल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121