शिर्डीचे साईबाबा (इ. स.१८५८ ते १९१८) हे आधुनिक महाराष्ट्रीय संतांपैकी एक विश्वविख्यात संत म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची विदेशात अनेक मंदिरे भक्ती व सेवा कार्याची सामाजिक सद्भाव केंद्रे आहेत. ब्रिटिश काळातील ‘मॅजिस्ट्रेट’ पदावरून निवृत्त श्री. गो. र. तथा अण्णासाहेब दाभोळकर यांनी साईबाबांच्या हयातीत त्यांच्या संमतीने ‘श्रीसाईसच्चरित’ लिहिले. हे ५३ अध्यायांचे ‘साईसच्चरित’ साईभक्तांचे गीता-भागवत मानले जाते. साईबाबांनी १९११ साली शिर्डीत रामनवमी उत्सव सुरू केला. अनेक भक्तांना रामरूपात दर्शन दिले. ‘सबका मालिक एक’ बोध करीत पारमार्थिक एकतेचा संदेश दिला. श्रद्धा व सबुरीचा उपदेश केला. ‘जैसा भाव तया तैसा अनुभव।’ अशी साईबाबांची रीत होती. त्यांनी कोणाला ज्ञानेश्वरी दिली, कोणाला ‘भागवत’, कोणाला ‘विष्णुसहस्रनाम’ दिले. साईंचा स्वतःचा कोणताही वेगळा पंथ संप्रदाय नव्हता. त्यांनी सर्वांना ‘श्रद्धा-सबुरी’ आणि माणुसकीच्या धर्माचा उपदेश केला.
साईचि आम्हा परब्रह्म। साईचि आमुचा परमार्थ परम।
साईचि श्रीकृष्ण श्रीराम। निजराम साई ॥६५॥ (अ.४)
श्री. साईबाबांचे ‘लीला चरित्र’ साईभक्त हेमाडपंत (कै. गो. र. उर्फ अण्णासाहेब दाभोळकर, (इ.स.१८५६ ते १९२९) यांनी साईबाबांच्या अनुमतीने त्यांच्या हयातीतच लिहिले. पण, ते साईबाबांच्या निर्वाणानंतर (१९१८) तब्बल १०-१२ वर्षांनी प्रकाशित आहे. ५३अध्यायांचे ओवीबद्ध प्रासादिक असे हे ‘श्री साईसच्चरित’ साई भक्तभाविकांचे दृष्टीने गीता-भागवतच आहे. त्याशिवाय संतकवी दासगणू हे साईबाबांचे शिष्य होते. त्यांनीही साईबाबांचे चरित्र माहात्म्यपर चार अध्याय आणि ‘साई स्तवन मंजिरी’ लिहिलेली आहे. लेखक दाभोळकर यांना ‘हेमाडपंत’ हे नाव श्रीसाईबाबांनीच दिले. ते ब्रिटिश राजवटीत मामलेदार होते. पुढे वांद्रे (मुंबई) येथून ‘रेसिडेंट मॅजिस्ट्रेट’ म्हणून १९१६ साली निवृत्त झाले आणि मूळच्या व्यासंगी धार्मिकवृत्तीमुळे साईबाबांच्या भक्तीने आशीर्वादाने संतचरित्रकार झाले. श्री साईबाबांनी त्यांना रामरूपात दर्शन दिले व रामभक्ती हीच साईभक्ती असल्याचा प्रत्यय दिला. साईसच्चरित पोथीतील अध्याय-१९ मध्ये त्यांनी हा अनुभव दिला असून, राममहतीही गायलेली आहे. या रामनाम माहात्म्य कथनात हेमाडपंत वाल्मिकींचा दाखला देताना ‘राम नामाची महती। वर्णिलीसे संत महंती।’म्हणत-
ही दो अक्षरे उलटी स्मरला। तो कोळी वाटपाड्याही उद्धरला।
वाल्याचा वाल्मिक होऊन गेला।
वाक्सिद्धी पावला नवलाची ॥१८२॥
मरा मरा उलटे म्हणता। राम प्रकटला जिव्हेवरता।
जन्माआधीच अवतारचरिता। जाहला लिहिता रामायण ॥१८३॥ (अ.१९)
हेमाडपंत यांनी ही वाल्याकोळ्याची गोष्ट पौराणिक कथा व संतांच्या अभंगातून स्वीकारलेली आहे. त्याला वाल्मिकी रामायणाचा आधार नाही. तसेच ‘रामा आधी रामायण रचले’ ही सुद्धा एक लोक रूढ कल्पना आहे. मात्र, पुढील काही ओव्यांमध्ये हेमाडपंतांनी वर्णन केलेली रामनाम महती भावपूर्ण आहे.
रामनामे पतितपावन। रामनामे लाभ गहन।
रामनामे अभेद भजन। ब्रह्मसंपन्न या नामे॥१८६॥
रामनामाच्या आवर्तने। उठेल जन्ममरणाचे धरणे।
एका रामनामाचिया स्मरणे। कोटिगुणे हे लाभ ॥१८६॥
जेथे रामनामाचे गर्जन। फिरे तेथे विष्णूचे सुदर्शन।
करी कोटी विघ्नांचे निर्दालन। दीन संरक्षक नाम हे ॥१८७॥
रामाला हेमाडपंतांनी ‘पतितपावना’ म्हणून गौरवले असून, रामनामाने जन्ममरणाचा फेरा चुकेल म्हणजे मोक्षप्राप्ती होईल. रामनामाने अनेक प्रकारचा भौतिक व पारमार्थिक लाभ होता असे सांगून रामनाम हे संरक्षक कवच आहे, असे कथन करतात.
श्री साईबाबांना रामाविषयी विशेष प्रीती होती. पूर्वी शिर्डीमध्ये चैत्र महिन्यात एक ‘उरूस’ होत असे, त्याला साईबाबांनी रामनवमी उत्सवात परिवर्धित केले. रामनवमी दिनी रामजन्माचा कीर्तनासह, भजन, प्रवचन, कुस्त्या अशा विविध कार्यक्रमांनी तीन दिवस हा उत्सव संपन्न होतो. हेमाडपंत कृत साईसच्चरित पोथीतील सहाव्या अध्यायात साईबाबांनी शिर्डीमध्ये कशा प्रकारे रामनवमी सुरू केली. त्याची साद्यंत कथा वर्णिलेली आहे. त्यामुळे त्यांनी शिर्डीमध्ये १९११ साली रामनवमी उत्सवाचा प्रारंभ केला. तो रामनवमी उत्सव आता गेली ११० वर्षे अविरतपणे हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो.
साईबाबा महायोगी, द्रष्टे, साक्षात्कारी संत होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. ‘जया मनी जैसा भाव। तया तैसा अनुभव॥’ या उक्तीप्रमाणे साईबाबा येणार्या भाविकास त्यांच्या गुरुच्या, इष्टदेवतेच्या रूपामध्ये दर्शन देऊन संतुष्ट करीत होते. भक्तांच्या इच्छेनुसार त्यांनी काहींना विठ्ठलरूपात तर काहींना प्रभू रामचंद्राच्या रूपात दर्शन दिले.
‘साईसच्चरित’ अध्याय क्र.१२,१९,२७ आणि २९ अशा चार अध्यायात चार वेगवेगळ्या भक्तांना प्रभू रामाच्या रूपात दर्शन दिल्याच्या साईलीला आपण सविस्तर वाचू शकता.
संतकवी श्रीधरांचा ‘रामविजय’ हा साईबाबांचा प्रिय ग्रंथ होता. आपला देहरूपी अवतार संपवून १९१८ साली समाधी घेण्याच्या तीन दिवस आधी साईबाबांनी ‘रामविजय’ श्रवण केला. आपल्या वझे नावाच्या भक्तास तीन दिवस ‘रामविजय’ वाचन करण्यास त्यांनी पाचारण केले होते.
गुरुकृपांजन पायो मेरे भाई। रामाविना कछु मानत नाही।
अंदर रामा बाहर रामा। सपने में देखत सीतारामा।
जागत रामा सोवत रामा। जहाँ देखे वहाँ पूरनकामा।
या रामपदाच्या संकेतातून आपणास साईबाबांनी रामभक्तीचा, रामनामाचा बोध केला असा स्वानुभव हेमाडपंतांनी साईसच्चरित अ.१९ मध्ये वर्णिलेला आहे. अशाप्रकारे आपण साईबाबांच्या लीला चरित्रातून ‘रामदर्शन’ घडते, रामनाम माहात्म्य आकळते. साईबाबांना कोणी साईनाथ म्हणतात, तर अनेक भक्त ‘साईराम’ म्हणून जप करीत साईरूपातच रामभक्ती करतात. ॥ जय साई राम ॥
(पुढील भागात - पंडित कवी मक्तेश्वरांचे संक्षेप रामायण)
विद्याधर ताठे