कोण राखणार बेलापूरचा गड? तिहेरी लढत रंगणार

नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे

    23-Oct-2024
Total Views | 76

belapur


नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास


नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी यंदाही तिहेरी लढत रंगणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या मंदाताई म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गजानन काळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघडीने अदयाप आपले पत्ते उघड केले नसले तरी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे या निवडणुकात बेलापूरातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळेल.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात यापूर्वीही भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशीच लढत पाहायला मिळाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मनसे तिसऱ्या. त्यामुळे सलग दोनवेळा भाजपने याठिकाणी एकहाती विजय मिळविला आहे. हेच पाहता भाजपने विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांनाच उमेदवारी जाहीर केली. मात्र या उमेदवारीनंतर या मतदार संघात मोठ्या राजकीय घडामोडीची चक्र फिरत आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांना भाजपने पुन्हा संधी देत यंदाही उमेदवारी जाहीर केली. मात्र, मंदाताईंना उमेदवारी जाहीर होताच संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेत विधानसभेसाठी म्हात्रे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निश्चय केला. मात्र या मतदारसंघाचा इतिहास पाहता, या विधानसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड आहे. लोकसभेच्या निकालानुसार महायुतीसाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघ पोषकही आहे.
साधारण वर्षभरापुर्वी भाजप पक्षाने संदीप नाईक यांच्याकडे भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद सोपविले होते. त्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यकारणीवर त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली होती. मात्र, नेहमीप्रमाणे या विधानसभा निवडणूक जाहीर होताच बेलापूर मतदारसंघात म्हात्रे विरुद्ध नाईक या संघर्षाने डोकं वर काढलं. भाजपने मंदा म्हत्रे यांना उमेदवारी जाहीर करताच संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेण्याची घोषणा केली. अद्याप राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष शरद पवार गटाने नवी मुंबईत आपले पत्ते उघड केलेले नसले तरी संदीप नाईक यांच्या पक्षप्रवेशाने नाईक विरुद्ध म्हात्रे या चर्चाना उधाण आले आहे.
आता या मतदारसंघातील यापूर्वीची मतांची आकडेवारी पाहूया, २००९ मध्ये नवीन विधानसभा रचनेत नवी मुंबई शहरात ऐरोली आणि बेलापुर असे दोन विधानसभा क्षेत्र तयार झाले. नवीन बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक हे पहिल्यांदा निवडून आले. त्यांनी भाजपचे सुरेश हावरे यांचा पराभव केला होता. २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ५५ हजार ३१६ एवढी मते घेत विजय मिळवला. तेव्हाही बेलापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून गणेश नाईक होते. २०१४ मध्ये गणेश नाईक मंत्री असताना राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा अवघ्या १४०० मतांनी पराभव करत त्या जायंट किलर ठरल्या होत्या. पुढे २०१९ साली गणेश नाईक यांनी त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ला भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार म्हणून मंदा म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीत ४४ हजार १५७ मतांनी विजय मिळविला. म्हात्रे यांना एकूण ८८ हजार ०८८ मते मिळाली होती. तर यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांना एकूण ४३ हजार ९२३ मते मिळवत म्हात्रे यांना कट की टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. मनसेच्या गजानन काळे यांनाही या निवडणुकीत २७ हजार ३९२ मते मिळाली. हे पाहता मंदा म्हात्रे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. पुढे २०१९ साली गणेश नाईक हे देखील भाजपमध्ये आल्याने या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली.
ऐरोली विधानसभा मतदार संघातून भाजपने यंदाही गणेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, बेलापूरातील जागेवरून नाईक यांच्या पुत्राने तुतारी हाती घेतल्याने आता बेलापुरतील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्याकडे तर बेलापूर शरद पवार गटाकडे असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने यादी जाहीर न केल्याने ही जागा उद्धव ठाकरेंकडे राहणार की शरद पवार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121