रवींद्र वायकरांच्या घरी ईडीची धाड! राणेंनी घेतला ठाकरेंचा समाचार
09-Jan-2024
Total Views | 79
मुंबई : मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहे? असा सवाल करत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेचा चांगलाच समाचार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, "सुजीत पाटकर, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण हे कोणाचे मुखवटे आहेत? कोणासाठी या कंपन्या तयार करुन मनी लॉण्ड्रिंगचे पैसे फिरवत आहेत. मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या वहिनी या रवींद्र वायकरच्या पार्टनर आहे?"
"उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय अजून किती शिवसैनिकांचा बळी घेणार आहेत. स्वत: भ्रष्टाचार करुन पैसे कमवायचे आणि ते बाहेरगावी पाठवायचे. त्यानंतर कारवाई होत असताना कधी रवींद्र वायकर, कधी सुरज चव्हाण तर कधी पुण्या पारेख असे येतात. पण कधीतरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांनी सांगावं की, आम्ही पैसे घेतले होते आणि आमच्या नावाने पैसे फिरले होते. त्यांनी एकदा बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन शपथ घेत महाराष्ट्राला सांगावं की, सुजीत पाटकर, रवींद्र वायकर, सुरज चव्हाण यांनी केलेल्या व्यवहारात ठाकरे कुटुंबियांचा हात नाही. हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?," असा सवालही त्यांनी केला आहे.