मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की ‘सिंहासन’ आठवतो : फडणवीस

नाट्यसंमेलनात नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला टोला

    07-Jan-2024
Total Views | 93
100th AkhilBharatiya Natya Sammelan in Pune

पुणे : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा संमेलन हस्तांतरण सोहळा पुणे येथे रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. ‘सिंहासन’ चित्रपटाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, ”महाराष्ट्रात ‘कट्यार पाठीत घुसली’ हे २०१९ साली नाट्य घडले. त्यानंतर आम्ही देखील २०२२ साली ‘आता होती गेली कुठे’ हे नाट्य केले, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्ट्याची गरज नाही", असे म्हणत नाव न घेता फडणवींसांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.

यावेळी प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष झाल्यापासून अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे असे म्हटले यावर फडणवीसांनी अध्यक्ष झाल्यावर ही कला आमच्यातल्या राजकारण्यांनाही शिकवा असे म्हटले. ‘सिंहासन’ चित्रपटाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्याला पट्ट्याची गरज नाही, असे म्हणत नाव न घेता फडणवींसांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले की, “आज आपला राजा त्याच्या जन्मस्थानी विराजमान होत आहे. मनोरंजनाच्या जगतात प्रत्येक गोष्ट प्रभू श्री रामापासून सुरु झाली आहे, कारण आपण कधी रामापासून वेगळे होऊन शकत नाही”, असे म्हणत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख फडणवीसांनी केला. “ देशाच्या अमृतकाळानंतर महाराष्ट्राच्या अमृतकाळाकडे वळत चाललो आहे. या अमृतकाळात नाट्य, संगीत, कला कुठे असेल याचा विचार करणे गरजेचे आहे. आजही देशातील सर्वोत्तम रंगभूमी ही मराठी रंगभूमी आहे. आणि जोपर्यंत मराठी रसिक जीवंत आहे तोपर्यंत वाचक संपू शकत नाही. तुम्ही उत्तम नाटक नाही तर उत्तम रसिक प्रेक्षक तयार केले आहेत”, असे कौतुकास्पद उच्चारले. विक्रम गोखले यांनी देऊ केलेल्या २ एकर जागेत वृद्ध कलावंतासाठी वास्तु उभी करण्याचा निर्णय घ्यावा, त्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत आम्ही करु, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामले यांना दिले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे नाट्यगृहाचे भाडे कमी करावी अशी मागणी केली पण आपण सगळ्यांनी इतकी रसिक प्रेक्षकांची संख्या वाढवली पाहिजे की तुम्हीच उपमुख्यमंत्र्यांकडे येऊन नाट्यगृहांची भाडेवाढ दुप्पट करावी असली मागणी कराल”, असे सकारात्मक बोल मुनगंटीवार यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, “जोपर्यंत ७५ नाट्यगृहे उभारणार नाही तोपर्यंत आम्ही पद सोडणार नाही आणि तुम्ही पण आम्हाला सोडू द्यायचं नाही”, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम खुणे या गडचिरोली सारख्या विदर्भातील झाडीपट्टीच्या कलाकारांना पद्मश्री सारखा पुरस्कार मिळाला ही अभिमानास्पद बाब आहे”.

यावेळी अ.भा.म.नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मनोगत व्यक्त करत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे राज्यातील सर्व नाट्यगृहांत जे शासकीय व्यवस्थापक नेमले जातात, त्यांना बऱ्याचदा त्यांची कामे माहित नसल्यामुळे कामात अडसर येतो. अशावेळी ज्येष्ठ कलावंतांची निवड संबंधित नाट्यगृहांमध्ये उपव्यवस्थापक म्हणून नेमणूक करावी, अशी प्रमुख मागणी दामले यांनी मुनगंटीवार यांच्याकडे केली. पुढे प्रशांत दामले म्हणाले की, “राजकारणी असायच्या आधी दोन नाट्यवेडे या संमेलनाला आले आहेत. नाट्य रसिक असल्यामुळे नाटक जगणं काय असतं हे त्या दोघांना माहित आहे. सांस्कृतिक विभागाने आजपर्यंत आम्हाला खुप सहकार्य केले आहे. प्रशासकीय बाबी कशा मांडायच्या आहेत त्याचे मार्गदर्शन आम्हाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तमरित्या करतात”, असे म्हणत दामलेंनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पाच महिने सुरु राहणार असून या संमेलनाचा सांगता सोहळा रत्नागिरीत होणार आहे. याशिवाय या पाच महिन्यांच्या नाट्य संमेलनाच्या कालावधीत सर्व कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे.

“महाराष्ट्र हे पहिले राज्य असले पाहिजे जिथे शासनाने विद्यापिठातील कलाविभागाला आर्थिक सहाय्य केले पाहिजे. त्यामुळे ७-८ कोटी प्रत्येक विद्यापिठातील नाट्य विभागाला शासनाने दिले पाहिजे”, अशी विनंती जब्बार पटेल यांनी उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्याकडे केली. तसेच, परिषद यापुढे बंगाली, कन्नड अशा विविध रंगभूमींना एकत्र करुन भारतीय रंगभूमीचे स्वरुप देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि, भविष्यातील संमेलनात दोन नाटकं पाश्चात्य नाटक दाखवण्याचा प्रयत्न देखील नक्की करु”, अशी ग्वाही देखील दिली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121