मुंबई : येत्या १५ ते २० दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह, बोधवाक्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडते. निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या १५ ते २० दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील," असेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे येत्या काळात आणखी कुठला पक्ष फुटणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवारांना प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, शरद पवारांनी एक-दोन जणांना निवडून आणून दाखवावे. पवारांकडे पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काळजी चिंता करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
आव्हाडांबाबत ठाकरे, पवारांनी खुलासा करावा
प्रभू श्री राम संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. प्रभू श्री रामाच्या विरोधात बोलले की, प्रसिद्धी मिळते, हे आव्हाडांना माहिती आहे. म्हणून अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात आले. अशी वक्तव्य करताना आव्हाडांना लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाबद्दल खुलासा करावा, असेही गिरीश महाजन म्हणाले.