ठाकरेंना दणका! "नालायकांमुळे पक्ष सोडावा लागतोयं!" अंधारेंवर गंभीर आरोप
अंधारसेना दहा जिल्ह्यात सुपारी घेण्याचं काम करतेयं : अनिल जगताप
06-Jan-2024
Total Views | 935
बीड : उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पक्षाला राम राम ठोकल्याने उद्धव ठाकरेंना चांगलाच दणका बसला आहे. काही नालायक लोकांमुळे पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पक्षात अंधार सेनेचं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात झाली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती दिली.
येत्या ९ तारखेला रात्री ८ वाजता अनिल जगताप काही पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचं काम करत असताना आणि बाळासाहेबांचे विचार बीड जिल्ह्यात रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. मी उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केलं आणि पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडली. त्यानंतर जिल्हाप्रमुख झाल्यानंतरही मी अनेक कार्यक्रम घेतले. पुढे मला विधानसभेची संधी आली. त्यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन मागणी केली. उमेदवारीच्या यादीमध्ये नावही आलं पण रात्री ३ नंतर काय झालं ते माहिती नाही. त्यानंतरही निष्ठेने काम करत राहिलो पण तरीही अनेकदा अन्याय होत राहिला. विधानसभा जवळ आली की, माझ्यासोबत असं का होतं प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाही."
पुढे ते म्हणाले की, "बीड जिल्ह्यात काही दिवसांपुर्वीच आलेल्या अंधार सेनेचं वर्चस्व निर्माण करण्याची सुरुवात केली गेली. त्यानंतर त्यांनी पक्षप्रमुखांना काय सांगितलं ते कळलं नाही. असे लोकं पक्षात काम करत असतील तर कधीच पक्ष वाढणार नाही. अंधारेंनी महाराष्ट्रात अंधार करायचं ठरवलं आहे. काही नालायक लोकांमुळे पक्ष सोडून जाण्याची वेळ आली आहे. ही अंधार सेना दहा जिल्ह्यात सुपाऱ्या घेण्याचं काम करत आहे," असा गंभीर आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.