मुंबई : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातील हजारो रामभक्त अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी येणार आहेत. एकीकडे राममंदिर उभारले जाण्याबद्दल चर्चा आणि कौतुक सुरु असताना सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे भजन लोकप्रिय होताना दिसत आहे. या भजनाची गायिका स्वाती मिश्रा हिचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
स्वाती मिश्राचे पंतप्रधानांनी केले कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन स्वातीचे आणि "राम आएंगे" या गाण्याचं कौतुक केले आहे. "श्री रामलल्ला यांच्या स्वागतासाठी स्वाती मिश्रा यांनी गायलेले हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे..."."राम आएंगे" हे मंत्रमुग्ध करणारे भजन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या भजनावर रील बनवत आहेत. या भजनाची युट्यूब लिंक देखील शेअर केली आहे.
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी 'रामलला'ची स्थापना होणार आहे. राम जन्मभूमीत भगवान रामाच्या स्वागताची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर ट्रस्टने भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह सुमारे सात हजार लोकांना निमंत्रण पाठवले आहे.