राज्यसभा निवडणुकीमुळे ठाकरे-पवारांची गोची!

    30-Jan-2024
Total Views | 114
rajya sabha election 2024 News

राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या ५६ जागांमध्ये महाराष्ट्रातील ६ जागा आहे. ज्या सहा राज्यसभा जागांसाठी दि. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्ष अर्थात, महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे. या सहा राज्यसभा जागांचा विचार करता, भाजपचे प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन, नारायण राणे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपत आहे. याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदतही संपत आहे. अशात राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने राज्यात पक्षादेश (व्हिप) महत्त्वाचा ठरणार आहे. तरी या निवडणुकीत कोणाचं पारड जड असेल? ठाकरे आणि पवारांची या राज्यसभा निवडणुकीत कशी गोची होणार आहे? राज्यसभा खासदार कसे निवडून दिले जातात.

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून, ते कधीही विसर्जित होत नाही. मात्र, या सभागृहाचे एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यांचा कालवधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे निश्चित केली आहे.राज्यसभेला काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं. यालाच वरिष्ठ सभागृह म्हणजे अप्पर हाऊसही म्हणटले जाते. देशभरातून २४५ खासदार राज्यसभेत निवडून जातात. त्यातील १२ सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. उर्वरित २३३ देशातील सर्व राज्यांतून निवडले जातात. त्यातील आता ५६ जागांसाठी निवडणुक होत आहे. ज्यात महाराष्ट्रातील सहा जागा आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवडा दिला. त्यामुळे या निवडणुकीत व्हीप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. ज्यामुळे ठाकरे गट अडचणीत आलायं. तर दुसरीकडे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू असून, राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय १५ फेब्रुवारीपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे.

आता राज्यसभेत कोणाचं पारड जड आहे आणि राज्यसभेत उमेदवार कसे निवडून येतात हे पाहू?राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. तर राज्यसभेच्या १९ जागा आपल्या राज्यात आहेत. पण या सर्व जागांसाठी एकाच वेळी निवडणुक होत नाही. तर ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते. त्यामुळे आता जर सहा जागांसाठी निवडणुक होत असेल तर त्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळेल. पण भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम मतदारसंघाची जागा रिक्त आहे. त्यामुळे आताच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २८७ आमदार मतदान करतील.मग २८७ ला ७ ने विभाजित केल्यावर ४२ मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असल्याचे लक्षात येते. म्हणजे प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीत ४२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
 
त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल जाणून घेऊ? पक्षीय बलाबलाचा विचार केला तर ,महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे १५ ते १६ आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे फक्त ११ आमदार आहेत. तर काँग्रेस पक्षाकडे ४४ आमदार आहेत. तर दुसरीकडे महायुतीतील भाजपाकडे १०४ आमदार, राष्ट्रवादी (अजित पवार गटाकडे) ४२ आमदार, शिवसेना (शिंदे गटाकडे) ४० आमदार आहेत. उर्वरित बहुजन विकास आघाडीकडे ३ आमदार, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्तीकडे प्रत्येकी दोन आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, CPIM, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे प्रत्येकी एक आमदार आणि अपक्ष १३ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे या राज्यसभा निवडणूकीत भाजप तीन जागांवर आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदे गट प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून आणू शकतात. तर काँग्रेस एक जागेवर निवडून येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यात अशात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाची हार निश्चित आहे. त्यातही ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण निवृत्त होत असून ही दोन्ही गटांना पक्षातील फुटीमुळे जागा मिळणार नाहीत. ज्यामुळे दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमवणे अवघड जाणार आहे. अशात ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.तरी या राज्यसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट कोणाला उमेदवारी देतात ही उत्सुकता आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारी दिली जाईल.तरी कोणाला उमेदवारी दिली जाईल.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121