राजदत्त : एक कर्मयोगी...

    27-Jan-2024
Total Views |

Rajdutta


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून १२ नावांची घोषणा करण्यात आली. यातलेच एक नाव म्हणजे दत्ताजी/राजदत्त. दत्ताजी/राजदत्त हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक आहेत. ज्यांच्या कार्याने मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने जगाच्या पडद्यावर आली. त्यांच्या कष्टाची आणि चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने राजदत्त यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
 
वर्ध्याच्या एका शाळेची सहल, बल्लारशाला दगडी कोळशाची खाण बघायला विद्यार्थ्यांना घेऊन गेली होती. सहलीहून परत आल्यावर शिक्षकांनी सहलीवर एक निबंध लिहायला सांगितला. प्रत्येकाने आपल्या सहलीचे बाळबोध वर्णन करणारा निबंध लिहिला. मात्र, एका विद्यार्थ्याचा निबंध इतरांपेक्षा वेगळा होता. शिक्षकांनी म्हणून त्याला कार्यालयात बोलवून घेतले. तो घाबरतच, आपले काही चुकले की काय, हा विचार करत तिथे गेला. शिक्षकांनी विचारले, “तुला असे वेगळे विचार कसे सुचले लिहायला?” पण, तो म्हणाला, “काही नाही, मला जे दिसले, जे जाणवले तेच मी लिहिले.” लहानग्या दत्तात्रेयाने खाण, खाणीबाहेर परिसरातच असलेली त्या मजुरांची घरे पाहून रात्रंदिवस काम करणार्‍या मजुरांना आयुष्यभर याला तोंड द्यावं लागणार आहे, हा अंतर्मुख करणारा विचार निबंधात लिहिला होता. ‘आपले तर हात-पाय सहलीपुरतेच काळे झाले आहेत, कायमचे नाहीत.’ आपल्या निबंधात व्यक्त केलेल्या या विचारांनी शिक्षकसुद्धा प्रभावित झाले होते. हा विद्यार्थी म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्दर्शक दत्तात्रेय अंबादास मायाळू तथा राजदत्त!
 
शाळेतील शिक्षक बाकरे यांनी हा निबंध प्रसिद्ध पत्रकार व साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांना दाखवला, तर त्यांची शाबासकी तर मिळालीच. पण, शिक्षण पूर्ण झाल्यावर एका दैनिकात नोकरीही मिळाली. पुढे दैनिक बंद पडल्यावर मद्रासला (म्हणजे आजचे चेन्नई) जाऊन ‘चांदोबा’ या मासिकासाठी संपादक म्हणून त्यांनी काम केले. हे काम साधारण दोन वर्षे चालले. पण, राजदत्त यांच्या इथेच त्यांच्या दिग्दर्शनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गुरू राजाभाऊ परांजपे यांची आणि अतच स्टुडिओची जवळून ओळख झाली ती कायमचीच. आपल्या या गुरूबद्दल आदर असणार्‍या दत्तात्रेय यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. ते गुरूंचे नाव आपल्या नावाला जोडून ‘राजदत्त’ नाव घेऊनच! १९६०ला ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला मिळाले. पाठोपाठ ‘सुवासिनी’, ‘पाठलाग’ नंतर भालजी पेंढारकर यांच्या ‘घरची राणी’ या चित्रपटाचेही दिग्दर्शन करायला मिळाले. या चित्रपटालासुद्धा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला.
 
‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’ असो की, ‘तू सुखकर्ता तू दुखहर्ता’ ही अष्टविनायकातील गीते १९७९ पासून ते आजही प्रत्येकाच्या मनात रेंगाळतात. विशेषत: गणेशोत्सवात तर जास्त. नुसती गाणी लोकप्रिय झाली म्हणजे चित्रपट चांगला झाला असे होत नाही. एकूणच चित्रपट हा कथा, गीते, संगीत, नृत्य यांची उत्तम गुंफण केल्यामुळे प्रभावी होतो. आस्तिक आणि नास्तिक या विषयावर भाष्य करणारा ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट असाच अत्यंत प्रभावी ठरला होता. इतका की, गिरगाव, दादर आणि पुण्यातील ‘प्रभात’मध्ये या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. आजही हा चित्रपट लोकांना तेवढाच आवडतो. याचे दिग्दर्शन राजदत्त यांचे होते. असेच आणखी एक गीत- ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी,’ हे गायिका आशा भोसले यांच्या स्वरातले गीत ‘हुंडाबळी’ कथानकावरील ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातल. एखादं गीत अनेक वर्षं प्रेक्षकांच्या लक्षात राहतं म्हणजेच तो चित्रपटही लक्षात राहतो. कारण, त्या चित्रपटाचा प्रभाव आणि तो प्रभाव असतो दिग्दर्शनाचा. असे उत्तम सामाजिक आशय असलेले चित्रपट, मालिका गेल्या ५० वर्षांच्या काळात दिग्दर्शक राजदत्त यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता ‘मधुचंद्र’ (१९६७). कारकिर्दीच्या प्रारंभीलाच केलेल्या या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
 
त्यांनी दिग्दर्शित केलेले हे आणखी काही चित्रपट - ‘वर्‍हाडी आणि वाजंत्री’ (१९७३), ‘भोळीभाबडी’ (१९७३), ‘पुढचं पाऊल’ (१९८६), ‘अर्धांगी’ (१९८५), ‘हेच माझं माहेर’ (१९८४), ‘मुंबईचा फौजदार’ (१९८४), ‘घरची राणी’ (१९६८), ‘अपराध’ (१९७९), ‘अष्टविनायक’ (१९७९), ‘या सुखांनो या’ (१९७५ ), ‘देवकीनंदन गोपाळा’ (१९७७), ‘अरे संसार संसार’ (१९८१), ‘शापित’ (१९८२), ‘सर्जा’ (१९८७ ). हे सगळेच चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाले ते त्यातील हाताळलेल्या विषयांमुळे, त्यातील देण्यात आलेल्या संदेशामुळे आणि सिद्धहस्त दिग्दर्शनामुळे!
 
राजदत्त यांनी चित्रपटाबरोबरच छोट्या पडद्यासाठी अर्थात दूरदर्शनसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘गोट्या’ मालिका, ‘मन वढाय वढाय’ (मानवी मनाच्या स्पंदनाची उकल करणारी कथा), ‘मर्मबंध’ (लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या विचारांचा वेध घेणारी मालिका), युवकांचे स्फूर्तीस्थान असलेले विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील मालिका अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील दहा मालिका आपल्याला दिल्या. त्याबरोबर लघुपट आणि माहितीपटातून संत ज्ञानेश्वर यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी ‘सखा माझा ज्ञानेश्वर’, ‘काज’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘राजगड’, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्यावरील माहितीपट, प्रसिद्ध साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांच्या जीवनावरील लघुपट, (जो आठ भाषांत प्रसिद्ध झाला), दिव्यांग मुलांचे विश्व उलगडून दाखवणारे ‘कथा अरुणोदयाची’ आणि ‘एका पाऊलवाटेची स्वर्णजयंती’ हे लघुपट त्यांनी तयार केले.
 
रंगमंचासाठीसुद्धा त्यांनी समर्थ रामदास यांच्या जीवनावरील पहिलं महानाट्य ‘आनंदवन भू-वनी’ दिलं. ज्याचे ५० प्रयोग पण झाले.तब्बल अर्धशतकाइतका दीर्घ काळ त्यांनी मोठ्या पडद्यासाठी प्रचंड काम तर केलंच, पण कालांतराने आलेलं दूरदर्शन हे माध्यमही तितक्याच समर्थपणे हाताळले. वर दिलेल्या छोट्या पडद्यावरील सादर झालेल्या लोकप्रिय मालिका ही त्याचीचं साक्ष देतात. त्यांच्या मराठी चित्रपटांच्या संस्मरणीय कामगिरीची यासाठी दखल घ्यावी लागते की, जेव्हा ८०च्या दशकात मराठी चित्रपटाच्या निर्मितीची संख्या काळजी वाटेल इतकी घटली होती आणि पुढे काय, असा यक्ष प्रश्न उभा राहिला होता. त्या काळात राजदत्त यांनी दरवर्षी एक अशी सलग सात वर्षे अप्रतिम दर्जेदार मराठी चित्रपट देऊन या सृष्टीला संजीवनी दिली, आत्मविश्वास दिला. ओळीने सात वर्षं ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवा’त ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’ म्हणून मिळालेल्या सन्मानाचे बहुधा हे एकमेव उदाहरण आहे!
 
चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी चित्रपटाचा सामाजिक आशय महत्त्वाचा असतो. कारण,चित्रपट हे माध्यम जनसंवादाचे माध्यम आहे, ते प्रबोधनाचे माध्यम आहे. एकाच वेळी अनेक लोकांना संदेश देण्याची प्रचंड ताकद या माध्यमात आहे. असं हे माध्यम हाताळण्यात दिग्दर्शक म्हणून राजदत्त श्रेष्ठ ठरलेत, म्हणून ‘शापित’, ‘सर्जा’, ‘पुढचं पाऊल’ यांना उत्कृष्ट चित्रपटासाठीचे ‘रजतकमळ’ आणि ‘फिल्मफेअर’ पुरस्कार प्राप्त झाले, तर ‘देवकीनंदन गोपाळा’ हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर कर्नाटक व तामिळनाडूमध्ये नि इंग्लंड व अमेरिकेतही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे, तर ‘ताश्कंद फेस्टिव्हल’मध्येसुद्धा तो दाखविला गेला. ‘शापित’ चित्रपटासाठी ‘रशियन कौन्सिल’ने त्यांचा गौरव केला. या सगळ्या गोष्टी राजदत्त यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणार्‍याच आहेत.
या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या अशा चौफेर कामगिरीचा वेध घेतला, तर प्रकर्षाने जाणवते ती त्यांची लहानपणापासून झालेली जडणघडण आणि संघाचे संस्कार, सामाजिक प्रश्नाची जाण आणि त्या विषयी असलेली तळमळ, देशाप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा. त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन काळात आणि तरुणपणात लाभलेले शिक्षक, तरुण दत्तात्रेयातल्या असामान्य आकलनशक्तीचा गुण हेरणारे साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर, पैलू पाडण्यासाठी मिळालेला हा हिरा ओळखणारे राजा परांजपे, श्रेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रारंभीच्या महत्त्वाच्या व्यक्ती.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते बालवयातले स्वयंसेवक. संघबंदीच्या काळात सत्याग्रही असलेल्या दत्ताजींनी तुरुंगवासही भोगला. संघ प्रचारक सदुभाऊ डांगे नाटिका लिहीत. त्यात राजदत्त भूमिका करत. विद्यार्थीदशेत ‘दूरचे दिवे’, ‘उद्याचा संसार’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ अशा नाटकात त्यांनी भूमिका केल्या. नंतरही काही मोजक्याच चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. पण, एक तत्व त्यांनी पाळले ते म्हणजे स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात भूमिका करायची नाही. समाजकार्य तर अंगवळणी पडलेलं. आपण समाजाचे देणे लागतो या जाणिवेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. म्हणूनच महाविद्यालयात असताना सेवाग्रामजवळील ‘कुष्ठधाम’ केंद्रात सुश्रुषा पथकात त्यांनी चार-पाच वर्षे काम केलं.
 
दत्ता यांच्या अंगात तर राष्ट्रभक्तीची भावना ओतप्रोत भिनलेली. गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी भाग घेतला होता. त्यात पोलीस स्टेशनवरील पोर्तुगीजांचा झेंडा काढून तिरंगा झेंडा त्यांनी फडकविला होता. यावेळी त्यांना अटक झाली व शिक्षा झाली. समाजाला प्रेरणा देणारे, नव्या जाणिवा निर्माण करणारे विषय चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात, हे राजदत्त यांनी जाणून हाती घेतलेल्या विषयांना पूरेपूर न्याय दिला आहे. सामाजिक प्रश्नांची सखोल जाण असल्यामुळे, आपण समाजावर कलेच्या माध्यमातून काय संस्कार करू शकतो, याची उत्तरे शोधणारे राजदत्त ‘संस्कार भारती’शी स्थापनेपासून (१९८१) जोडले गेले आहेत. अगदी प्रारंभापासून त्यांच्या मार्गदर्शनाचा, अनुभवाचा लाभ मिळत आहे.
 
चित्रपट क्षेत्राची ओळख एक भपकेबाज, स्वप्नमयी दुनिया अशीच आजही आहे. पण, अशा क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला दत्ता यांच्यासारखा एवढा मोठ्ठा माणूस संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांबरोबर साधेपणाने वावरतो तेव्हा आपण आपोआपच नतमस्तक होतो!
 
दत्ता यांची ओळख १९९४ पासूनची. ‘संस्कार भारती’च्या कामाच्या सुरुवातीच्या काळातच अशा दिग्गज, महान व्यक्तीचा सहवास लाभला व त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, हे मी माझे परमभाग्य समजते. बैठका, कार्यक्रम, त्यांच्या प्रवासात केलेली व्यवस्था, त्यांच्याबरोबर ‘संस्कार भारती’ची नवी समिती स्थापन करताना केलेला प्रवास, विशेषांक व स्मरणिका याच्या तयारीसाठी वेळोवेळी झालेल्या भेटी, चर्चा, गप्पा यातून त्यांचं व्यक्तिमत्व अधिकच समजत गेलं. किती साधेपणा! समोरच्या कुठल्याही व्यक्तीला बरोबरीचा दिलेला सन्मान ही नक्कीच मोठी गोष्ट वाटते.
 
इंदोर येथे ‘संस्कार भारती’चे संस्थापक सदस्य व मार्गदर्शक योगेंद्रजी यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मला त्यांच्यावरील (म्हणजे योगेंद्रजी) फिल्म तयार करण्याची जबाबदारी दिली होती. ते एक आव्हानच होतं आणि जेव्हा मला कळलं की, दत्ताजी पण या कार्यक्रमाला आले आहेत, तेव्हा मनातून मी जरा घाबरले! मी जे काही कमीत कमी वेळात, अत्यल्प उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित धाडस केलेले होतं, त्याचं आता परीक्षण दत्ताजी करणार. म्हणून घाबरतच त्यांना सांगितलं की, “१९४७ सालचे जुने काहीच उपलब्ध नव्हते.” तेव्हा ते सहजपणे म्हणाले, “अगं मग मला मागायचं की!
 
माझ्याकडे होते ते! तुला सगळे दिले असते, पण हरकत नाही जे झालयं ते ही चांगलंचं झालयं आणि लोकांना ती आवडली आहे ना!” बस्स, त्यांचं हे बोलणं ऐकून मी नि:शब्दच झाले. मला हे अनपेक्षित होतं. इथेच मला त्यांच्यातील ऋषितुल्य, पितृतुल्य व्यक्तीचे दर्शन झाले. इतरांनी त्यांना आग्रह केला की, रांगोळीवरती फिल्म करा ना आमची. तर त्यांनी सांगितलं, “आता हिला (म्हणजे मला उद्देशून) सांगा ती फिल्म करायला.” समोरच्यामध्ये विश्वास निर्माण करणं, सकारात्मकता घेऊन पुढे जायला शिकवणं, हे त्यांचे गुण विशेष उल्लेखनीय!
 
त्यांच्या साधेपणाचा आणखी एक अनुभव घेतला. एकदा एका लग्नासाठी राजदत्तजी जळगावला नागपूरहून वर्‍हाडाबरोबरच आले होते. आम्हीही इथून गेलो होतो. तिथल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, दत्ताजींना इथला कार्यक्रम झाल्यावर रात्री झोपायला आणि दुसर्‍या दिवशी लग्नानंतर दुपारी विश्रांतीला कोणा कार्यकर्त्यांकडे व्यवस्था केली होती तिथे न्यायचे. पण, दत्ताजींनी नम्रपणे सांगितलं की, मला सर्व विधींना प्रत्यक्ष हजर राहायचे व बघायचे आहेत आणि या विवाहाचा आनंद अनुभवायचा आहे. मी कुठेही येणार नाही. इथे मी ठीक आहे आणि वर्‍हाडी मंडळीतीलच एक वर्‍हाडी म्हणून ते तिथेच थांबले. सर्व विधींचे, घटनांचे, लग्नाच्या लगबगीचे अगदी बारकाईने, शांतपणे नव्याने निरीक्षण करत होते ते.
 
१९९४ मध्ये प्रथम भेट झाली तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्यात कसलाही बदल नाही. धोतर, गुरुशर्ट आणि खांद्याला अडकवलेली शबनम एवढच सामान! कार्यकर्त्यांच्या बरोबर जी व्यवस्था सर्वांची असेल त्याच्याशीच जुळवून घेणार. साधी राहणी उच्च विचारसरणी तीही एका वलयांकित व्यक्तीची. ५० वर्षांच्या प्रदीर्घ काळाचा संपन्न अनुभव, झगमगत्या दुनियेत काम, पण कुठेच बडेजाव नाही, प्रसिद्धी नाही, मिरवणं नाही की आढ्यता नाही... एका तपस्वी, ज्ञानी कर्मयोग्याचे हे दर्शन दिव्यत्वाची प्रचिती देणारं असेच आहे नि याबरोबरच एखाद्या गोष्टीबद्दल खोलवर केलेलं चिंतन, घटनेचं सूक्ष्म निरीक्षण, शिस्त, साधेपणा, नम्रता आणि नावाप्रमाणेच मायाळू अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या ठायी आहेत. या सगळ्याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक भेटीत वेळोवेळी येतो. भारतीय चित्रपटसृष्टीच्या देदीप्यमान इतिहासातलं राजदत्त हे सोनेरी पान आहे. तसेच चित्रपट हे मनोरंजनाचे साधन असले तरी ते संस्कार करण्याचे, प्रबोधन करण्याचे आणि आचारविचारांवर ठसा उमटविणारे प्रभावी साधन आहे, हे लक्षात घेऊन त्याचा उपयोग दिग्दर्शक राजदत्त यांनी केला आहे. सर्व मराठी रसिक प्रेक्षकांतर्फे, कलाकारांतर्फे राजदत्त यांना मानाचा मुजरा.
राजदत्त यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, ही प्रार्थना!
अग्रलेख
जरुर वाचा
शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121