नवी दिल्ली : अयोध्येत दि. २२ जानेवारी २०२४ सोमवारी रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. जगभरात या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. पण, त्याचवेळी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात बाबरी ढाच्याच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तणाव वाढला आहे.
व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी विद्यापीठाच्या बाहेर पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कारण, अद्यापपर्यंत दिल्ली पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
जामियातील बाबरी समर्थक विद्यार्थ्यांनी ढाच्या समर्थनार्थ विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना बंद पुकारण्याचे आवहान केले होते. विद्यापीठ प्रशासनाच्या दाव्यानुसार, बाबरी समर्थ विद्यार्थ्यांच्या आवहानाचा कोणताही परिणाम विद्यापीठाच्या दैनंदिन शैक्षणिक कार्यावर झालेला नाही.
विद्यापीठ अधिकाऱ्याने सांगितले की, "काल २-३ विद्यार्थी होते ज्यांनी घोषणाबाजी केली आणि फलक दाखवले. आम्हाला माहिती मिळताच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आले. विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.”