मुंबई : सर्वत्र 'जय श्री राम हा एकच जयघोष ऐकू यात आहे. देशातील तमाम रामभक्तांचे डोळे रामलललाचे दर्सन करण्यासाठी आसूसलेले आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. अशात अभिनेते अनुपम खेर हे देखील अयोध्येत पोहोचले असून त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात जाऊन पूजा केली असून रामाच्या भक्तीत तल्लीन झालेले ते पाहायला मिळत आहेत.
अनुपम खेर यांनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “प्रभू श्रीराम यांच्याजवळ जाण्याआधी हनुमानाचे दर्शन घेणं आवश्यक आहे. मी २१ हनुमान मंदिरांचा एक व्हिडीओ बनवत आहे. मी इथे तीन महिन्यांपूर्वीही आलो होतो. अयोध्येत सगळीकडे जय श्री रामचा जयघोष पाहायला मिळत आहे. आज श्रीरामाच्या भक्तीत जगभरातील हिंदू तल्लीन आहेत. पुन्हा दिवाळी आली आहे, ही दिवाळीच खरी दिवाळी आहे,” असे अनुपम खेर म्हणाले.
दरम्यान, रजनीकांत, चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रोहित शेट्टी, आयुष्यमान खुरानासह क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर देखील अयोध्येत पोहोचले आहेत. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जयश्री रामाचा जयघोष सुरु असून गायक सोनू निगम, गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातून रामाची गाणी ऐकायला उपस्थित मान्यवरांना मिळत आहे.