उद्धव ठाकरेंचे हात रामभक्तांच्या खुनाच्या रक्ताने माखलेत! आशिष शेलारांचा घणाघात
02-Jan-2024
Total Views | 75
मुंबई : समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केल्याने उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच ठाकरेंचा उबाठा गट जागांसाठी देशभर सरपटत आहे, असेही ते म्हणाले आहेत. मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले की, "राम मंदिरासाठी ज्या कोठारी बंधुंनी बलिदान दिले आहे त्यांचा खून मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने केला आहे. त्याच मुलायम सिंग यांच्याशी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी हातमिळवणी केली आहे. रामभक्त, कारसेवक कोठारी बंधुंच्या खुनाच्या रक्ताने समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांच्या हातालाही रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलं आहे."
"आमच्याबरोबर असताना आमच्याकडे या, बंगल्यावर या, अशा पद्धतीचा अहंकार दाखवणारे उध्दव ठाकरे आता सरपटत दिल्लीला चालले आहेत. त्यांना सरपटत दिल्लीला जाऊ दे. आज महाराष्ट्र हे बघतो आहे की, ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागा जिंकण्यासाठी आणि मदतीसाठी देशभर सरपटतो आहे. ज्यावेळी ते आमच्याबरोबर होते त्यावेळी ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने टिकवला होता. स्वार्थ आणि स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी लोलुपता केवढी होते हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवले आहे," असेही ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, "शरद पवारांकडे किती आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आहेत हे आधी स्पष्ट करावे. तसेच मुळात तो पक्ष आहे की, गट आहे, हेदेखील सांगावे. अजुनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना तो गट आहे या सत्यावर यावे लागेल. महाराष्ट्रात जे उद्योग येतात त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं काम उबाठा करते. त्यामुळे राज्यातील कुठलाही उद्योग बाहेर गेला असेल तर त्याला उबाठा जबाबदार आहे," अशी टीकाही त्यांनी केली आहे.