मुंबई : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या इथे रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडणार असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे राम मंदिर उद्धाटन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. सोमवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर निवडणूकीत हिंदु समाजानेही बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, "राम मंदिर कार्यक्रमाकरिता सर्वांनी उपस्थित राहायला हवं होतं. पण काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीच्या वेळी हिंदु समाजाने या सर्वांवर बहिष्कार टाकावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. हा कार्यक्रम भाजप, आरएसएस किंवा विश्व हिंदू परिषदेचा नसून तो राम मंदिर ट्रस्टने आयोजित केला आहे. यासाठी सर्व धर्मगुरुंना बोलवण्यात आले आहे. मलाही निमंत्रण आले असून मीदेखील जाणार आहे," असेही त्यांनी सांगितले.