’राम’ राष्ट्रपुरूष ; ’रामायण’ राष्ट्रीय ग्रंथ

    13-Jan-2024
Total Views | 110
Ramayana

‘रामायण’ हे रम्य महाकाव्य असले, तरी तो भारताचा इतिहास आहे आणि वाल्मिकींनी इतिहास म्हणूनच धर्मज्ञ, कृतज्ञ, पराक्रमी राजाचे चरित्र, ‘रामायण’ लिहिले. स्वयं वाल्मिकींनीही ‘इतिहास लिहितो’ असे अनेकवार म्हटलेले आहे. यादृष्टीने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर साकारलेले भव्यदिव्य मंदिर हे राष्ट्रपुरुषाचे राष्ट्रमंदिर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दि. २२ जानेवारी रोजी होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा, नव्या भारताच्या स्वाभिमान युगाचा श्रीगणेशा आहे.
 
 
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायकाः॥


शरयू नदीकाठी वसलेल्या, अयोध्यानगरीचे भारतीय लोकमानसामध्ये प्राचीन काळापासून अनन्यसाधारण पवित्र स्थान आहे. प्रभू रामचंद्रांची राजधानी आणि जन्मभूमी म्हणूनही या नगरीचे महत्त्व व माहात्म्य विशेष आहे. श्रीरामाचा जन्म ज्या रघुकुलामध्ये झाला, त्या रघुकुल राजघराण्याने अनेक आदर्श, तत्त्वनिष्ठ, सत्यव्रती राजे भारतवर्षाला दिलेले आहे. राजा श्रीराम या राजघराण्याच्या कीर्ति मंदिरावरील कळस आहे, ध्वजा आहे. कवी कुलगुरू कालिदासांनी या दिग्विजीयी राजघराण्यावर ’रघुवंश’ नावाचे १९ सर्गाचे महाकाव्य लिहिलेले असून, ते महाकाव्य भारतीय अभिजात साहित्यविश्वातील एक ध्रुवतारा आहे.

रामनाम धनं मेऽस्ति स्वमायो रामचिन्तनम्। कथा रामस्य विश्रांतिः श्रीरामः शरणं मम॥
 
श्रीराम हा राजा, परब्रह्म म्हणून पूजनीय वंदनीय आहेच; परंतु त्याची देव, परब्रह्म म्हणून पूजा-उपासना करतानाच, तो आपला अभिमान वाटावा, असा ’राष्ट्रपुरुष’ आहे, याचा विसर पडता कामा नये. त्याची सत्यनिष्ठा, त्याची कर्तव्यनिष्ठा आणि वीर पराक्रमी पुरुषार्थी वृत्ती यांचे स्मरण व पूजन आपल्या समाजाला पुरुषार्थाची प्रेरणा देणारे आहे. वाल्मिकींनी लिहिलेले ’रामायण’ हे पुरुषार्थाची गाथा आहे. वाल्मिकी नंतरच्या विविध रामकथा व अनेक रामायणांनी पराक्रमी पुरुषार्थी रामाला परब्रह्म, अवतारी देव म्हणून अधिक प्राधान्य देऊन मूळच्या वीरकथेला पूर्णपणे भक्तिकथेचे, देवकथेचे धार्मिक रूप दिले. भक्ती क्षेत्रामध्ये या भक्तीयुक्त रामकथेचे महत्त्व निश्चित आहे; पण समाजातील पुरुषार्थ, वीरवृत्ती जागृत-सतेज ठेवण्यास मूळ ’वाल्मिकी रामायणा’चे नित्य स्मरण महत्त्वाचे आहे.

मंदिरसंस्था माहात्म्य : सांस्कृतिक विद्यापीठ

हिंदू मंदिरांना फार मोठी वैभवशाली परंपरा, इतिहास आहे आणि या दोन्ही गोष्टींचे सम्यक दर्शन आपणास अयोध्या येथील नूतन श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य, दिव्य, विराट रुपात होणार आहे. हिंदू मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ती चर्च वा मशिदीसारखी केवळ उपासने स्थळे नाहीत तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या हिंदू संकल्पनांची संगम स्थळे आहेत. सामाजिक-सांस्कृतिक एकता, समरसतेची परम निधाने आहेत. मानवी जीवन संपन्न, उन्नत करणार्‍या समग्र कला, संगीत, नृत्य, नाट्य यांना स्थान मान देणारी आणि जतन-संवर्धन करणारी व्यासपीठे-विद्यापीठे आहेत. भारतीय संगीत नृत्यकला हे केवळ रंजनाचे साधन नसून, त्या सकल कलांचा जन्म ईश्वराची उपासना म्हणून झालेला आहे. मूर्तिकला, शिल्पकला, चित्रकला अशा समस्त कलांचे आश्रयस्थान व विद्यालय म्हणजे मंदिर होय! आध्यात्म भक्ती हे मुख्य अधिष्ठान असणारी मंदिरे ही धर्म-संस्कृतीची ऊर्जा केंद्रे आहेत. या सर्व गोष्टींचे भान ठेवूनच अयोध्येतील नव्या श्रीराम जन्मभूमी मंदिराची बारकाईने व कौशल्याने आखणी व उभारणी झालेली आहे. अयोध्येचं हे रामजन्मभूमी मंदिर कोट्यवधी भारतीयांची आस्था व अस्मितेचे केंद्र म्हणूनच या पुढे सार्‍या जगात ओळखले जाईल. ते कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच देश-विदेशातील जिज्ञासूंच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र होईल. हे मंदिर संकुल प्राचीन भारतीय मंदिर संस्था संकल्पनेचे दिव्य दर्शन घडवेल.

अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवरील नूतन मंदिरात दि. २२ जानेवारी रोजी होणारी बाल रामाची (रामललाची) प्रतिष्ठापना ही केवळ एका विग्रहाची प्रतिस्थापना नसेल, तर नवभारताच्या अस्मितेची, स्वाभिमानाचीच ती प्राणप्रतिष्ठा आहे. या मंदिर उभारणीमध्ये भारतातील सर्व प्रांतातील खास वैशिष्ट्यपूर्ण असे दगड, लाकूड आदी साधनसामुग्री, कलाकौशल्य गुणवत्ता आणि देशभरातील रामभक्त मजदूर-सेवकांचे अथक परिश्रम या सर्वांचा सहभाग असून, या अर्थाने हे मंदिर राष्ट्रीय एकता व समन्ययाचे स्थळ आहे. प्रभू श्रीराम आमची आस्था आणि राष्ट्रपुरूष आहे. या भावनेने सर्वांनी केलेल्या अथक, सेवाभावी समर्पित परिश्रमाचे देदीप्यमान, चिरंतन शिल्प म्हणूनही हे नूतन रामजन्मभूमी मंदिर ओळखले जाईल.


कृतार्थतेचा सुवर्ण दिवस

हे मंदिर गेली ५०० वर्षे रामभक्तांनी केलेल्या संघर्ष व संकल्प सिद्धीचे परममंगल स्मारक आहे. गेल्या पाच शतकांमध्ये असंख्य रामभक्त, संतमहंत, धर्माचार्य, मठाधिपती, कारसेवक यांनी दिलेल्या लढ्याच्या, संघर्षाच्या बलिदानांच्या यशस्वी मंगल परिपूर्तीचे परमनिधान आहे. ज्या-ज्या रामभक्तांना या संघर्षात लढ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले, त्यांच्या धन्यतेचा, कृतार्थतेचा सुवर्ण दिन म्हणून दि. २२ जानेवारीचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाणार आहे. संत तुकोबांच्या वाणीत सांगायचे, तर ’याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोड व्हावा।’ ५०० वर्षांच्या संघर्षानंतर बलिदानानंतर प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेर हो ’गोड दिवस’ उगवला आहे. ’जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी।’ म्हणून लंकेची सोन्याची नगरी तुच्छ मानून जन्मभूमीला स्वतः प्रभू रामांनी दिलेले महत्त्व, अयोध्येचे अगाध माहात्म्य अधोरेखित करणारे आहे. यापेक्षा वेगळे अयोध्या माहात्म्य पाहण्याची गरज नाही. अशा पार्श्वभूमीवर अयोध्येचे श्रीरामजन्मभूमी मंदिर जगातील एकमेवाद्वितीय मंदिर संकुल ठरणार आहे.



-विद्याधर ताठे

(पुढील रविवारी : श्रीराम अवताराची थोरवी)

अग्रलेख
जरुर वाचा
शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121