मुंबई : नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या ‘अन्नपुर्णी’ या दाक्षिणात्य चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना महागात पडले आहे. या चित्रपटात प्रभू श्रीराम मांसाहार करत होते असा संवाद असून यावरुन वादंग निर्माण झाला आहे. देशातील समस्त हिंदु वर्गाच्या भावना यातून दुखावल्या गेल्या असा आरोप करत विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर निदर्शने करत नेटफ्लिक्सवरुन चित्रपट काढण्याची मागणी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर झेंडे फडकवत नयनतारा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अन्नपूर्णी' चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली. दरम्यान, या आंदोलनानंतर काही कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय आहे संवाद?
अन्नपुर्णी या चित्रपटात "भगवान श्रीराम हे देखील मांस खाणारे होते" असा संवाद वापरण्यात आला आहे. या संवादाबद्दल 'अन्नपूर्णी' च्या निर्मात्यांना एक निवेदन जारी केले होते, ज्यात जोपर्यंत हे दृश्य चित्रपटातून हटवण्याचा आणि नेटफ्लिक्सवरुन चित्रपट काढून काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
निर्मात्यांनी याबद्दल स्पष्टीकरण देत म्हटले होते की, "हिंदू आणि ब्राह्मण समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा चित्रपटाचा सह-निर्माता म्हणून आमचा कोणताही हेतू नाही. आणि याद्वारे संबंधित समुदायाच्या भावना दुखावल्या आणि झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करू इच्छितो," असे 'अन्नपूर्णी'च्या निर्मात्यांनी निवेदनात म्हटले आहे.