नवी दिल्ली : प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित ‘क्राफ्ट्स बाजारा’मध्ये महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल परदेशी पाहुण्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘जी २०’ शिखर परिषदेसाठी देशाची राजधानी नवी दिल्ली आणि प्रगती मैदानातील भारत मंडपम सज्ज झाला आहे. जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत मंडपमच्या शेजारीच केंद्र सरकारने ‘क्राफ्ट्स बाजारा’चेही आयोजन केले आहे. यामध्ये भारताच्या विविध भागांतील हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री केंद्र असणार आहे. ज्यात ‘एक जिल्हा एक उत्पादन, जीआय (भौगोलिक संकेत) टॅग केलेल्या वस्तू आणि महिला व वनवासी कारागिरांनी तयार केलेली उत्पादन प्रदर्शित केली जाणार आहे.
देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचे व्हिजन प्रकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे ही सर्व प्रदेशांमध्ये सर्वांगीण सामाजिक-आर्थिक वाढीस गती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
‘जी २०’ शिखर परिषदेत सहभागी होणारे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय मीडिया या प्रदर्शनाला भेट देऊ शकतील आणि स्थानिक पातळीवर उत्पादने खरेदी करू शकतील. क्राफ्ट्स बाजार केवळ भारतात बनवलेल्या उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणार नसून स्थानिक कारागिरांसाठी नवीन आर्थिक संधी देखील उघडेल. भारतीय कारागिरांची कौशल्ये आणि उत्कृष्ट कारागीर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना दाखविण्याच्या उद्देशाने, प्रदर्शनात कुशल कारागिरांची थेट प्रात्यक्षिकेही दाखवली जातील. वस्त्रोद्योग मंत्रालय आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वयाने जी २० सचिवालयाद्वारे हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. सुमारे 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदश तसेच खादी ग्राम व उद्योग आयोग ट्रायफेड आणि सरस अजीविका यांसारख्या केंद्रीय संस्था या एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत.
ही आहेत क्राफ्ट्स बाजारातील उत्पादने
१. पंजाबमधील फुलकारी
२. जम्मू – काश्मीरची कशिदाकरी
३. हरियाणाचील पंजा धुर्री
४. हिमाचल प्रदेशातील चंबा रुमाल
५. उत्तर प्रदेशची चिकनकारी
६. बिहारची मधुबनी चित्रे
७. बंगालची कंठा एब्रॉयडरी
८. झारखंडमधील वनवासी दागिने
९. मणिपूरमधील बांबू क्राफ्ट
१०. ओडिशाची पट्टचित्रे
११. आसाममधील हातमागावर विणलेली वस्त्रे
१२. अंदमान आणि निकोबारमधील शेल क्राफ्ट्स
१३. तामिळनाडूची कांचीपुरम सिल्क साडी आणि तंजावर पेंटींग
१४. आंध्र प्रदेशातील कलमकारी
१५. गोव्याचे क्रोशे विणकाम
१६. महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल