मुंबई : मुंबईतील रेल्वे रुळांवरील ओव्हरहेड वायरच्या तपासणीसाठी लेझर आणि अॅपआधारित ‘ओएचई मापन गेज’ यंत्रणा मुंबई विभागाकडून विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ओव्हरहेड वायर तपासणीचे तासांचे काम केवळ काही मिनिटांमध्ये होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच ही यंत्रणा हाताळण्यास सहज शक्य असून तपासणीकरिता वापरण्यात येणाऱ्या अवजड टॉवर वॅगनसाठी एक पर्याय उपलब्ध झाला असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
नव्या यंत्रणेचे फायदे
या नव्या यंत्रणेमुळे जीपीएस सुविधेसह रूळ आणि ओव्हरहेड वायरमधील उंचीसह रुळांमधील अंतर मोजणे शक्य होणार असून त्याची नोंद देखील स्वयंचलित पद्धतीने करता येणार आहे. अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जलद, सुरक्षित आणि अचूक ओएचईचे मापन शक्य होणार आहे. त्याचबरोबर ही यंत्रणा हलकी आणि हाताळण्यास देखील सोपी असल्यामुळे टॉवर वॅगनची गरज नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या यंत्रणेकरिता रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्याची गरज भासणार नाही.
‘ओएचई’ तपासणी का महत्त्वाची?
ओव्हरहेड वायरमधील उंची कमी-जास्त असल्यास ओएचई इंजिनच्या (इमू/लोको) पँटाग्राफमध्ये अडकणे, ओएचई पार्टिंग होणे यांसारखे अपघात होण्याची शक्यता असते. तर तपासणी करण्याकरिता तीन मार्गांवर ब्लॉक घ्यावा लागत असून टॉवर वॅगन तपासणी या प्रक्रियेकरिता ब्लॉक घेणे अनिवार्य असते.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!