पडळकरांच्या मध्यस्थीला यश; साताऱ्यात धनगर आरक्षणासाठीचे उपोषण अखेर मागे
24-Sep-2023
Total Views | 33
मुंबई : मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दा ही महाराष्ट्रात पेटलेला असताना. धनगर आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिगृहावरती विशेष बैठक केली. मात्र दुसरीकडे दहिवडीत धनगर आरक्षणासाठी चार तरुण हे उपोषणाला बसलेले होते.या चारही तरुणांची समजूत काढण्यात गोपीचंद पडळकर यांना यश आल्यानंतर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व पडळकर यांच्या उपस्थितीत या तरुणांनी उपोषण मागे घेतले. धनगर आरक्षणासाठी गणेशोत्सव संपला की पहिल्या आठवड्यात चारही उपोषणकर्त्यांना घेऊन बैठक लावली जाईल.
जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बाब करावी लागली, तरी पालकमंत्री म्हणून ती मी करेन. दोन महिन्यांचा कालावधी सरकारला द्यावा, पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी घेतो, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपोषण करत्यांना दिले. पालकमंत्री शंभूराजे देसाई व गोपीचंद पडळकरांच्या विनंतीला मान देवून उपोषणकर्त्यांनी शनिवारी सहाव्या दिवशी रात्री उशिरा उपोषण सोडले.
दहिवडी येथे उपोषणस्थळी दिवसभर विविध घडामोडी घडल्या. सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. पालकमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या निर्णयावर उपोषणकर्ते ठाम राहिले, तर सोमवारपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सकल धनगर समाजाने दिला होता. त्यानंतर हालचाली गतिमान झाल्या व रात्री सव्वा नऊ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख हे उपोषणस्थळी दाखल झाले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
मागण्या ऐकल्यावर पालकमंत्री म्हणाले, सातारा जिल्हास्तरावरील विषय हे गणेशोत्सवानंतर स्वतंत्र बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील. राज्यभर मेंढपाळांवर जाणीवपूर्वक हल्ले होत असतील, तर संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. चार राज्यात कसे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आले, त्याचा अभ्यास करणाऱ्या समितीत धनगर समाजाच्या दोन प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.
संबंधित समितीच्या कामाचा पाठपुरावा करून त्याची माहिती वेळोवेळी देण्याची जबाबदारी माझी असेल. मी यासंबंधी सरकारचा प्रतिनिधी म्हणून लेखी देतो. तसेच गायरान जमिनी मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी देण्यासंबंधी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्राशी चर्चा करण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी मान्यवरांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आंदोलन सोडले.