७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण - शासनाचा मोठा निर्णय!
31-Aug-2023
Total Views | 41
मुंबई : श्रावण म्हटलं की सणांची रेलचेल सुरू होते. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे दहीहंडी. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवात दहीहंडी व लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोविंदाचा विमा उतरवणे व प्रो- गोविंदा लीग स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै, २०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील निर्णयानुसार १८ ऑगस्ट, २०२३च्या शासन निर्णयान्वये सन २०२३ मधील दहीहंडी उत्सवामध्ये तसेच प्रो- गोविंदा लीग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण ५०,००० गोविंदाना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच सराव व प्रशिक्षण असलेल्या तसेच प्रत्यक्षात भाग घेणाऱ्या अतिरिक्त २५००० गोविंदाना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी होत आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण १८,७५,००० रुपये इतका निधी अदा करण्यासाठी दहिहंडी समन्वय समिती,महाराष्ट्र या संस्थेस वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरुप हे संदर्भाधिन १८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तरतूदीनुसार व संबंधीत विमा कंपनीच्या अटीनुसार राहील. विमा संरक्षणाचा कालावधी हा शासन निर्णयाच्या तारखेपासून ते ८ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राहील.