नवी दिल्ली : 'एनडीए' आणि 'आयएनडीआयए' या दोन्ही आघाड्या भांडवलशाहांच्या फायद्याचा विचार करणाऱ्या आहेत. त्यामुळे बसपा यापैकी कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही, असे प्रतिपादन बसपा प्रमुख मायावती यांनी केले आहे.
बसपाप्रमुख मायावती या मुंबई येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीस जाणार असल्याचे आणि बसपा आयएनडीआय आघाडीत सामील होणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र, बसपाप्रमुख मायावती यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. त्या म्हणाल्या की, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी बसपा एनडीए अथवा आयएनडीआय या कोणत्याही आघाडीत सामील होणार नाही. प्रत्येक निवडणूक बसपा एकट्यानेच लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एनडीए आणि आयएनडीआय या दोन्ही आघाड्यांमधीस पक्ष हे गरीब विरोधी, जातीयवादी, भांडवलशाही धोरणे असलेले पक्ष आहेत, ज्यांच्या धोरणांविरुद्ध बसपा सतत लढत आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी युती करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकारच्या फेक न्यूज प्रसारित करू नये.