मुंबई : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने पुणे येथे आयोजित सोशल मीडिया मीट अप कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी अजित पवार गटावर टीका केली. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि भाजपच्या बाजूला जाऊन बसले. ईडीच्या भीतीमुळे झाला राजकीय भूकंप झाला. असं शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, आमची वैचारिक भूमिका बदललेली नाही. फक्त आत जावं लागेल, ते जावं लागू नये म्हणून निकाल घेतल्याचं सांगतात. याचा अर्थ राजकारणात, समाजकारणात सत्याची साथ सोडून कुणी दमदाटी करत असेल तर त्या रस्त्यानं जायचा निकाल घेतला असेल तर अशा भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांची अडचण झाल्याशिवाय राहणार नाहीत,"
"जे लोक गेले त्यांचं म्हणनं असं आहे आम्ही विकासासाठी गेलो याच्यात काही अर्थ नाही. जे लोक गेले आहेत त्याच्यातील बहुतेक लोकांवर केंद्रानं ईडीची चौकशी या ना त्या कारणानं सुरु केली. ईडीची चौकशी सुरु झाल्यावर काही लोक त्याला सामोरं जायला तयार नव्हते, अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. त्यांनाही बदल करा इकडे या असं सांगण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी वैचारिक भूमिका सोडणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अनिल देशमुख यांनी भूमिकेत बदल केला नाही," असं शरद पवार म्हणाले.