साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंनी निरर्थक वाद नाकारत स्विकारला केवळ मानवतावाद : सिद्धार्थ खरात
01-Aug-2023
Total Views | 36
मुंबई : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंनी सर्वप्रकारचा निरर्थक वाद नाकारत केवळ मानवतावाद स्विकारला असा सुर दै. ‘मुंबई तरूण भारत’ आणि इंग्रजी विभाग मुंबई विद्यापीठ आयोजित परिसंवादामध्ये उमटला. दि. ३१ जुलै रोजी मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना येथे झालेल्या परिसंवादात प्रा. डॉ. धनंजय भिसे, प्रा. डॉ. अनिल सपकाळ, डॉ. उज्ज्वला हातांगळे तसेच ज्योती साठे उपस्थित होते. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचे जीवन चरित्र आणि कार्याबद्दल परिसंवाद तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित यूट्युब व्हिडीओ स्पर्धेचा बक्षीस समारंभही या वेळी झाला. या परिसंवादात मान्यवर वक्त्यांनी साहित्य सम्राटांच्या जीवनातील विविध पैलूंबाबत विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला उद्धाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून गृहमंत्रालयाचे सहसचिव सिद्धार्थ खरात लाभले तर मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दै. ‘मुंबई तरूण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी प्रास्ताविक केले, ते म्हणाले “युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि सर्व समाजाला व्यासपीठ देण्याची आजची ही संकल्पना आहे. एखाद्या महापुरुषाचा गौरव करताना तो महापुरुष केवळ आमचाच आहे असं म्हणून त्याच्या कामाचा आणि विचारांचा आपण पराभव करतो. ही ‘मुंबई तरुण भारत’ची भूमिकाही नाही आणि रा. स्व. संघाची शिकवणही नाही, म्हणूनच सर्वांनी आण्णाभाऊंचा विचार अभ्यासावा यासाठी या स्पर्धेचे आणि परिसंवादाचे आयोजन केले आहे. अण्णाभाऊंच्याच्या शब्दात अंगार होता तो व्यासपीठ न मिळाल्याचा, आज या व्यासपीठावरून आपण सर्वांनी सहभाग घेऊन अभिव्यक्त व्हायला हवं,” असं मी उपस्थितांना आवाहन करतो.
इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सरगर म्हणाले की,“२०१९ मध्ये मी मागे रशियात गेलो होतो जगभरात अण्णाभाऊंच्या साहित्याचा अभ्यास व्हावा याचाच नेहमी विचार केला. त्यानंतर मॉस्को येथे जाऊन त्यांचे विचार प्रसारित केले. त्यांचे कर्तृत्व आणि विचार पोहोचवावे हाच अंतिम विचार होता. आज मुंबई तरुण भारतच्या पुढाकाराने हा कार्यक्रम करण्यामागेही हाच विचार आहे.
विचारप्रवर्तक मत प्रकट करताना सिद्धार्थ खरात म्हणाले की, “विचारांची चळवळ नेहमी सुरु राहायला हवी. त्यातच समाजाचं हीत आहे.कोणतीही भाषा जनमानसात पोहोचली तर ती समृद्ध होते. महापुरुषांचे विचार मरत नाहीत असं आपण ऐकतो पण ते खोटं आहे. त्यांचेही विचार वहाकाअभावी मरतात. आपल्याला आलेल्या अनुभवावरून साहित्यानिर्मिती अण्णांनी केली. रस्त्यावर मिळतील ती कामं करत त्यांनी साहित्यनिर्मिती केली. ”
गणेश चंदनशिवे आपले मनोगत मांडताना म्हणाले, “१६० वर्षाहून जास्त मोठी परंपरा असलेल्या विद्यापीठात गावगाड्याबाहेरच्या कलावंताचा सन्मान होतोय त्याबाबत आनंद आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली त्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊंनी शाहिरितून त्यांनी लोकशिक्षण दिलं, ही भूमी शेतकर्यांच्या कष्टावर उभी आहे असे ते म्हणाले. किरणजी योग्यच म्हणाले, एखाद्या समाजाने आपल्या समाजातील महापुरुषाला डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे. कारण ते पूर्ण भारताचेच नाही तर सार्या विश्वाचे आहेत. बाबासाहेबांच्या विचारावर मी आजवर चाललो आणि तमासगीराचा पोर विद्यापीठात विभागप्रमुख झाला.” त्यांनी आपल्या खणखणीत आवाजात छक्कड गात आपले मनोगत संपवले.
परिसंवादात उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ यांचे साहित्य आणि सामाजिक परिस्थिती या दोन मुद्द्यांना स्पर्श करून अनेक विषय विस्ताराने मांडले. आजच्या साहित्याकडे पहिले तर विद्रोह, शोषणाचे प्रश्न, भूक फारशी दिसत नाही. ही सर्व अण्णाभाऊंच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या साहित्यात विद्रोह आहे, लेखणीतून त्यांचा राजकीय विचार, सांस्कृतिक भूमिका आणि सामाजिक अपेक्षा स्पष्टपणे दिसून येते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गावगाडा, ज्ञाती व्यवस्था, संत पंत आणि तंत, काव्य आणि संस्कृती व मराठी भाषेचा संबंध, शिक्षण, पुरुषाचा स्वाभिमान, स्त्रीचं चारित्र्य आणि समाजाचे रक्षण ही अण्णाभाऊंच्या लेखणीची त्रिसूत्री तसेच अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रिवेध, बेरोजगार मातंग समाज आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण त्यासाठी काही करता येईल का, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दैनिकाने सामाजिक जाणीवेतून अण्णांच्या साहित्याची दखल घेतली. हा स्तुत्य उपक्रम आहे असे म्हणत भिसे यांनी ‘मुंबई तरुण भारत’चे कौतुक केले.
यूट्युब व्हिडीओस्पर्धा विजेत्यांचा सन्मान
प्रथम क्रमांक अनुष्का हिवाळे-परभणी, द्वितीय क्रमांक ध्रुव पटवर्धन-सातारा, श्रुती चौधरी-जुन्नर या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. तसेच नेटसेट आणि उच्चशिक्षण प्राप्त काही विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. खडतर प्रतिकुल परिस्थितीमधून कुंचीकोरवे समाजातील नेटसेट उत्तीर्ण झालेली मुंबईतील पहिली महिला म्हणून गौरी लालू कुंचीकोरवे यांचाही सत्कार करण्यात आला.