उपेक्षित पिंट्या ते डॉ. धनंजय भिसे

    01-Aug-2023   
Total Views |
Article On Dr Dhananjay Bhise

भूतकाळातील दुःखाचे भांडवल डॉ. धनंजय भिसे करत नाहीत. संघर्ष करत परिस्थिती पालटवत ते समाज आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्य करतात. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...

तीन दशकापूर्वीची गोष्ट. एक वेळची भाकर मिळवण्यासाठी पिंट्या भंगार गोळा करत होता. पण, पोलिसांनी चोर समजून त्याला पकडले आणि त्याला मारू लागले. ‘मी चोर नाही,’ मळक्या कपड्यातला १०-११ वर्षांचा पिंट्या गयावया करत राहिला. पण, तरीही पोलिसांचा मार खावाच लागला. दिवसभर रडत, थकून आणि प्रचंड विमनस्क अवस्थेत पिंट्या घरी आला. घर कसले?पिंपरी-चिंचवडच्या आदर्शनगरच्या मधोमध मोठा नाला. त्या नाल्याच्या बांधाला भिंत बनवून कागद आणि प्लास्टिक टाकून उभारलेली टपरीच. चोरी केली नसतानाही पोलिसांनी चोर समजून मारले हे कुणाला सांगणार? आई भंगार-कचरा वेचून कष्ट करून दमूनभागून आलेली. ‘आपण पोलिसांना चोर वाटलो’ हा विचार त्या बालमनाला अस्वस्थ करत होेता. यातून बाहेर पडले पाहिजे, असे पिंट्याला वाटले. आज पिंट्या तीन दशकांनंतर ‘डॉक्टरेट’ मिळून एका महाविद्यालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक असून मातंग साहित्य परिषद संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहे. इतकेच काय आता त्याला लोक ‘पिंट्या’ नाही, तर ‘डॉ. धनजंय भिसे’ म्हणून आदराने ओळखतात.

इतकेच काय काही महिन्यांपूर्वी ‘मातंग समाजापुढील प्रश्न’ या विषयाबद्दल रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासमोर डॉ. भिसे यांनी मनोगतही मांडले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये आज डॉ. भिसे यांना सन्मानीय विचारवंत म्हणून आमंत्रित करण्यात येते. वंचित घटकातील पिंट्या ते विचारवंत, समाजअभ्यासक डॉ. धनजंय सोमनाथ भिसे हा प्रवास सोपा होता का? तर नक्कीच नाही... मूळच्या सोलापूर माढामधील उपळाई खुर्दचे सोमनाथ भिसे आणि निर्मलाबाई हे मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंब. १९७२च्या दुष्काळात हे भिसे दाम्पत्य जगण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आले. त्यांना दोन पुत्र. त्यापैकी एक धनजंय उर्फ धनाजी उर्फ पिंट्या. अशातच सोमनाथ यांना दारूचे व्यसन लागले आणि त्यांच्या संसाराची वाताहतझाली. सोमनाथ व्यक्ती म्हणून चांगले होते, पण दारूच्या व्यसनाने सगळेच चुकले.

या काळात निर्मलाबाई दिवसभर काबाडकष्ट करत. मुलांनी शिकावे हाच ध्यास. पण, धनंजय यांचे शाळेत लक्षच नसे. त्यामुळे चौथीला ते अनुत्तीर्ण झाले. आईला प्रचंड वाईट वाटले. तिने धनंजय यांना शिकण्यासाठी अंबरनाथ इथल्या वसतिगृहामध्ये पाठवले. मात्र, तिथले ख्रिस्ती मिशनरी वातावरण धनंजय यांना मानवले नाही. आईची घरची आठवण येत असे. ते वसतिगृहातून पळून पुन्हा पिंपरीलाघरी आले. इतक्या लहान वयात पोरगं वसतिगृहातून पळून आलं. पोरगं बरचं आगाऊ आहे, म्हणत लोक त्यांच्या पोरांना धनंजयपासून दूर ठेवू लागले. लोकांची उपेक्षा आणि आपण वाईटच आहोत, असे त्यांचे वागवणे धनंजय यांच्या बालमनाला दुखावत असे. मात्र, यावेळी निर्मलाबाई अश्रू भरल्या डोळ्यांनी धनंजय यांना म्हणाल्या, ”लेकरा, मी इतके काबाडकष्ट कोणासाठी करते? माझ्यासाठी नको तुझ्यासाठी तरी तू शिकून सवरून कामधंद्याला लागायला हवं.”

आईचे अश्रू, तिची काळजी आणि ती करत असलेले कष्ट यामुळे धनंजय यांनी ठरवले की, आता शाळेत जायचे. शाळेत जात असतानाच ते मंडईमधील चहाच्या टपरीवर चहाचे कप विसळायचे काम करू लागले. शनिवार, रविवार आणि शाळेच्या मोठ्या सुट्टीत ते भंगार, कचरा वेचायचेही काम करत. या काळात त्यांच्या मामांनी, भगवान पवार यांनी त्यांना खूप आधार दिला. आठवी शिकत असताना धनंजय यांनी कुलकर्णी आजी-आजोबांच्या गायन, वादन खासगी शिकवणीमध्ये तबला शिकण्यासाठी प्रवेश घेतला. मात्र, शिकवणीचे शुल्क कुठून भरणार? त्यामुळे धनजंय तिथे जायचे टाळू लागले. धनजंय शिकवणीला येत नाही म्हणून चकचकीत घरात अतिशय सुखासीन परिस्थितीत राहणार्‍या कुलकर्णी आजी धनंजय यांच्या घरी आल्या. चहा प्यायल्या आणि धनंजयला म्हणाल्या, ”तू शिकवणीला येत जा. फीचा विचार नको करूस. माझ्या नातवासाारखा तू.” कुलकर्णी आजीचा स्नेह जातीपातीच्या भिंती तोडणारा होता.

पुढे धनंजय परिसरातील सामाजिक मंडळामध्ये सहभागी होऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही महापुरूषांबद्दलची व्याख्याने ऐकून त्यांच्या मनात शिक्षणाची आस जागृत झाली. आपण डॉक्टरेट मिळवावी, समाजासाठी, धर्मसंस्कृतीसाठी काम करावे, असे वाटू लागले. मग काम करता करता शिकत गेले. चणे-फुटाणे विकून, मसाल्याची पाकीटं विकून त्यांनी ‘एम.फील’ आणि पुढे ‘पीएच.डी’ही केली. ‘पीएच.डी’साठीत्यांना डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलकर, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. राजाभाऊ भैलुमे या सगळ्यांनी सहकार्य, मार्गदर्शन केले. समाजातील सर्वच सज्जनशक्ती या ना त्या रूपात त्यांच्यासोबत राहिली. त्यामुळेच की काय, सामाजिक समरसतेचे संस्कार त्यांच्यावर आपोआप होत होते.

समाजामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंसह सगळ्याच महापुरुषांचे चरित्र, विचार आणि साहित्य तसेच कर्तृत्व जसे आहे तसे पोहोचवावे, या ध्येयाने धनंजय यांनी ‘मातंग साहित्य परिषद’ स्थापन केली. समाजात वितुष्ट पसरवणार्‍या कोणत्याही विघातक शक्ती, व्यक्ती आणि विचारांविरोधात ठामपणे उभे राहत डॉ. धनंजय भिसे केवळ आणि केवळ सत्यासाठीच आवाज उठवतात. कार्य करतात. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी मार्क्सवाद नाकारत मानवतावाद स्वीकारला, हे सांगतानाची त्यांची तळमळ शब्दातीत आहे. हे का? तर समाजासमोर महापुरुषाचेविचार सत्यस्वरूपात यावे, यासाठी ‘पिंट्या ते डॉ. धनंजय भिसे’ हा त्यांचा प्रवास समरस समाजासाठी प्रेरणादायी आहे.

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.