तीस्ता सेटलवाडच्या अंतरिम जामीनास मुदतवाढ; पुढील सुनावणी १९ जुलै रोजी
05-Jul-2023
Total Views | 66
नवी दिल्ली : गुजरात दंगलप्रकरणी खोटे पुरावे तयार केल्याप्रकरणी आरोपी तीस्ता सेटलवाड हिला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीनास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भुषण गवई, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या विशेष खंडपीठाने याप्रकरणी गुजरात सरकारकडून उत्तर मागितले आहे. अंतिम निकालासाठी पुढील सुनावणी १९ जुलै होणार असल्याचे सांगितले आहे.
सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी गुजरात सरकारतर्फे युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी काही कागदपत्रांचे भाषांतर करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे, असे न्यायालयास सांगितले. सेटलवाड यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या विशेष सुनावणीत न्यायालयाने या कार्यकर्त्याला सात दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता, त्याची मुदत जुलै रोजी संपणार होती.
गुजरात दंगलीनंतर खोटे प्रतिज्ञापत्र आणि खोटे साक्षीदार बनवून निरपराधांना शिक्षा करण्याचा कट रचल्याप्रकरणी तिस्ता सेटलवाड हिच्या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला आहे.