मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरही भाष्य करणार असल्याचं टिझरमध्ये दिसत आहे. राऊतांनीही ट्विट करत माहिती दिली आहे. राऊतांच्या या ट्विटला आता भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.
"मित्र पक्षाला कसा धोका दिला ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. मुख्यमंत्री असताना घरी बसल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. विचारधारेला बाजूला टाकून महत्त्वकांक्षेसाठी सत्ता मिळवण्याची गोष्ट ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत, कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष तुमच्या अहंकरापोटी फुटल्याची कहाणी ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत. आणि हे सगळं कसं बरोबर आहे हे सांगण्यासाठी संजय राऊत ना लिहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत."अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे