मुंबई : मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटी अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनेक मालिकांचे सेट आहेत. तसेच, चित्रपटांचेही इथे चित्रिकरण होत असतेच. मात्र या ठिकाणी नुकताच एक प्रकार घडला. या चित्रनगरीत प्रसिद्ध कला दिग्दर्शकाचा अपमान करण्यात आला. त्याने आपलं ओळखपत्र दाखवूनही त्यांनी अडवणूक करुन त्यांना मानसिक त्रास दिला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक वासू पाटील यांनां चित्रनगरीतील सुरक्षारक्षकांनी अपमानस्पद वागणूक दिली. यावेळी त्यांनी थेट अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना फोन लावला आणि त्यांचे बोलणे करुन दिले तरी देखील तेथील सुरक्षारक्षकाने त्यांना आत जाण्याची परवानगी दिली नाही. अभिनेता अंकुर वाढवे याने पोस्ट शेअर केल्यामुळे हा प्रकार समोर आला.
वासू पाटील यांनी याबद्दल एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. वासू पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “धक्कादायक, काल काही कामानिमित्त मी मुंबईमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी मध्ये चाललो होतो. नियमानुसार मला सुरक्षारक्षक यांनी मला विचारपूस करण्यासाठी अडवले. मी ही थांबलो, पण मी माझे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ओळख पत्र दाखवले, तर उत्तर आले असले कार्ड चालत नाही.
मी बोललो मी कला दिग्दर्शक आहे मला, ‘जगदंब क्रिएशन’ च्या सेटवर मिटिंगला जायचे आहे, तर बोलले की आम्ही नाही ओळखत. कॉल लावून द्या नाहीतर मेसेज दाखवा. मी निर्मात्यांचा मेसेज दाखवला तर बोलला की असले मेसेज फेक असतात. मग मी डायरेक्ट डॉ. अमोल कोल्हे यांना संपर्क करून त्यांना बोलायला दिले तर मग पोपटासारखा बोलायला लागला आणि फोन बंद होताच पुन्हा मला नियमाने आत सोडायला येणार नाही, तुम्ही कोणालाही कॉल कराल, मी नाही ओळखत असं म्हणाला.
मग मला बोलला ‘जावा पुढे कसे जाता बघतो ‘ त्या बहाद्दराने २ नंबर गेटवर कॉल करून गाडी अडवायला सांगितली. तिथेही थांबलो. जसे काही अतिरेकी पकडल्यागत सगळे अंगावर आले. मग मी त्यांना तुम्ही सगळ्यांना याच चौकशीतून सोडता का असा सवाल केला.
मग त्यांची गडबड झालं. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मला घेऊन गेले. मला अस वाटलं की अरे मी बॉर्डर तर पार नाही केली ना, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे गेल्यावर पुन्हा प्रोडक्शनला कॉल लावून दिला. मग सगळे सारवासारव करायला लागले, पण मी त्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितले की साहेब तुम्हाला बदलीचा पिरेड असतो. पण कला दिग्दर्शकामुळेच या चित्रनगरीला महत्व आहे. आम्ही कायमच येत असतो. तर यावर चांगला तोडगा काढला पाहिजे. सर्वांना एकसारखे नियम,, नाहीतर कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे. यात माझा एक तास वेळ विनाकारण वाया गेला सोबत व्हिडीओ share करत आहे."
दरम्यान, दिग्दर्शक वासू पाटील यांनी रावरंभा’, ‘झाला बोभाटा’, ‘हाफ तिकीट’, ‘टुरिंग टॉकीज’ यांसारख्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे. त्यांना अशी वागणुक देणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.