अमली पदार्थ ही राष्ट्रीय समस्या : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
१ लाख किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट
17-Jul-2023
Total Views | 47
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमावारी दिल्ली येथे 'ड्रग्स स्मगलिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा' या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राज्यातील १ लाख ४४ हजार किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अमली पदार्थ तस्करी ही केवळ राज्याची किंवा केंद्राची नसून ती राष्ट्रीय समस्या आहे. याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करण्याची गरज आहे.
देशात अमली पदार्थांच्या तस्करीचे एक संपूर्ण रॅकेट आहे, त्याचा छडा लावण्यासाठी तपास करण्याची गरज आहे. १ जून २०२२ पासून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला. ज्या अंतर्गत ७५ दिवसांच्या मोहिमेत ७५,००० किलो ड्रग्ज नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. तथापि, आम्ही आतापर्यंत ८,४०९ कोटी रुपयांचे ५,९४,६२० किलो ड्रग्ज नष्ट केले आहेत, जे लक्ष्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यापैकी ३,१३८ कोटी रुपयांचे (१,२९,३६३ किलो) ड्रग्ज एकट्या एनसीबीने नष्ट केले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने अमली पदार्थमुक्त भारत निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. पूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीच्या मुख्य क्षेत्राला गोल्डन ट्रँगल आणि गोल्डन क्रिसेंट असे म्हणत. मात्र, भारताने त्यास पण आंतरराष्ट्रीय स्तरावर डेथ ट्रँगल आणि डेथ क्रेसेंट म्हणून स्थापित केले आहे. हा दृष्टीकोन अमली पदार्थांविरुद्धच्या भारताच्या लढ्याची दिशा आणि तीव्रता दर्शवते, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले आहे.