मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकात मोठा गदारोळ झाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेवरून विरोधी पक्षांनी सभात्याग केला आहे. शेकापाचे आमदार जयंत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेतला होता.
काही दिवसांपुर्वीच नीलम गोऱ्हेंनी उबाठा गटाची साथ सोडत, शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. सोबतच नीलम गोऱ्हे यांच्यावर कारवाई करण्यासाठी उबाठा गटाने विधीमंडळाच्या सचिवांना अर्ज दिल्याची माहिती त्यांनी दिली.
नीलम गोऱ्हेंच्या अपात्रतेवरुन पावसाळी अधिवेशनात यापुढेही मोठा गदारोळ होण्याची शक्यता. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत मनीषा कायंदे आणि बाजोरिया यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात आली आहे. ही तीनही विधानपरिषद सदस्य काही दिवसांपुर्वी उबाठा गटाला सोडून शिवसेनेत आले होते.