शाखा नव्हे नाका उभा करा... जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवा : राज ठाकरे
13-Jul-2023
Total Views | 83
चिपळूण : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पक्षबांधणीसाठी बाहेर पडले आहेत.
आजपासून ते दोन दिवसीय दापोली आणि चिपळूण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये त्यांनी आगामी निवडणूकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत.चिपळूणमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी निवडणूकांच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी "पक्ष सांगेल ते काम करावे लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही,.." असा सज्जड दमही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
राज्याच्या राजकीय वातावरणावर बोलण्यासाठी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. "माझ्या मनातील संताप मला बाहेर काढायचा आहे, त्यासाठी येत्या 15 दिवसात मी मेळावा घेणार; ज्यामध्ये भूमिका स्पष्ट करु.." असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी "लोकसभेची निवडणूक का लढवायची ? असा सवालच पदाधिकाऱ्यांना विचारला. दारु, मटन पार्ट्यांसाठी निवडणूका लढवायची का.. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच शाखा नव्हे नाका उभा करा... जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवा;" असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.