ठाणे : पावसाळा सुरु झाला तरी ठाण्यात रस्त्याची कामे सुरु असुन रस्त्यांचे तांत्रिक परिक्षण आयआयटीकडुन केले जात आहे. असे असले तरी पहिल्याच पावसाच्या दणक्याने काही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले. याची दखल घेत ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कुणाही प्राधिकरणाचे असोत रस्त्यांवरील खड्डे १२ तासात बुजवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असुन खडड्यापुरते ठीगळ न लावता खड्डे भरणी चौरसाकृती करावी.अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.दरम्यान, ०१ जुलैनंतर शहरात रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन सर्व यंत्रणांनी २४ x ७ सतर्क रहावे असेही आयुक्त बांगर यांनी बजावले आहे.
ठाणेकरांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी सुरु असलेली रस्त्यांची कामे ९० टक्के पुर्ण झाली आहेत. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी खड्डेमुक्त पद्धतीने प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर रस्तयांवर जर खड्डा पडला तर तो यंत्रणेच्या त्वरीत निदर्शनास येणे आवश्यक आहे. त्यासाठी शाखा अभियत्यांपासून ते नगर अभियंता पर्यंत संपूर्ण यंत्रणा पुढील चार महिने त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत राहतील. एखाद्या रस्त्यावर खड्डा पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे हे निदर्शनास आल्यास त्वरीत त्या रस्त्यांची डागडुजी अत्यंत तातडीने व प्राधान्याने होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला जात आहे किंवा कसे यावर यंत्रणेने लक्ष ठेवून असावे. तसेच १२ तासांच्या आत खड्डे बुजवण्याची कार्यवाही करावी.
शहरामधील काही रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी इ. यंत्रणांच्या ताब्यात आहेत, अशा सर्व रस्त्यांवर जर खड्डा दिसला तर त्या यंत्रणेने रस्त्यांची दुरूस्ती करण्याची वाट न बघता महापालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने दुरूस्ती करावी. रस्ता कोणाच्याही मालकीचा असो शेवटी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देणे ही सर्व यंत्रणांची सामुदायिक जबाबदारी असून त्यामध्ये महापालिकेने प्रमुख भूमिका निभावणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.