नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये महत्वाचे करार झाले आहेत, त्यामुळे भारत आता लवकरच सेमीकंडक्टर हब होईल; असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी व्यक्त केला आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारत हे पुढचे मोठे गंतव्यस्थान असेल, हे आज जगभर स्पष्ट झाले आहे. सध्या सर्व कंपन्यांनी भारताकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास सुरूवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी सेमीकंडक्टर सहकार्य क्षेत्रामध्ये मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात सामंजस्य करार झाला होता. त्याचाच परिणाम म्हणजे पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात सेमीकंडक्टर्सबाबत तीन मोठे करार झाले आहेत. त्यामुळे भारत सेमीकंडक्टर क्षेत्रमध्ये महत्त्वाचा उत्पादक म्हणून पुढे येण्यास सज्ज असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
जगभरातील देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतात, असे केद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले. पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी विश्वसनीय आणि सुरक्षित दूरसंचार तंत्रज्ञान विकसित करणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भारत-अमेरिकेतील भागीदारी रुंदावण्यामध्ये मोठी झेप घेतली आहे आणि उच्च कार्यक्षमता संगणन आणि अंतराळ क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ झाले आहेत, असेही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी यावेळी नमूद केले आहे.