१९७५ चा जून महिना. २६ जून... अचानक पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. मला आठवतंय, मी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यावेळी आणीबाणी म्हणजे काय, ती का लादली गेली, त्यामागचे राजकारण काय इत्यादी काहीच सखोल कळले नाही. पण, सर्व स्वातंत्र्यावर गदा आली आहे, वर्तमानपत्रावर बंदी, संघावर बंदी, भाषणस्वातंत्र्यावर बंदी हे सर्व जरा विचित्र आहे, अन्यायकारक आहे, हे समजण्यासारखे वय होते, एवढे नक्कीच. हा अन्याय दूर झाला पाहिजे, अशी साद माझ्यातील तरुण रक्ताने मला दिली.पण, नक्की काय करायचे?
पंतप्रधानांनी त्यांच्या विरोधात जे होते, त्या सर्वांना बंदिवान केले.कोणताही गुन्हा नसताना अटलजी, अडवाणीजी यांच्यापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर यांसारख्या जनसंघाच्या अनेक नेत्यांना ‘मिसा’खाली अटक केली. ‘मिसा’चा अर्थ आणीबाणी उठेपर्यंत बंदिवान. आणीबाणी कधी उठवायची, तेही त्याच ठरविणार! ही म्हणजे एकप्रकारे हिटलरशाहीच! समाजवादी पार्टीच्याही सर्व नेत्यांना असेच बंदिवान केले गेले.
हा अन्याय दूर झालाच पाहिजे, म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘जेलभरो आंदोलन’ करायचे ठरले. मागे वळून पाहताना, खरोखरच आश्चर्य वाटते. त्यावेळी टेलिफोन, टेलिव्हिजन, मोबाईल अशी कोणतीही संपर्काची साधने नसतानासुद्धा देशभर यशस्वीपणे सत्याग्रह झाले. आमच्यासारख्या तरुणांनी भविष्याचा विचारही न करता लाखोंच्या संख्येने सत्याग्रह केला आणि स्वतःला अटक करवून घेतली. मला आठवतंय, बैठका इतक्या गुप्त पद्धतीने होत की, बैठकीच्या ठिकाणी बाहेर चपलासुद्धा दूर दूर काढायचो. कारण, जर पोलिसांना काहीही सुगावा लागला, तर येऊन ते लगेच घेऊन जायचे आणि जेलमध्ये टाकायचे. नेत्यांची पहिली फळी जेलमध्ये असतानासुद्धा, ‘कोण निर्णय घेणार?’ असा विचारसुद्धा मनात न आणता, दुसर्या आणि तिसर्या फळीच्या कार्यकर्त्यानी सूत्रबद्ध कार्य केले. देशभरातील लाखोंच्यावर सामान्य नागरिक सत्याग्रह करून जेलमध्ये गेले. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापासून संघाच्या सर्व श्रेष्ठ श्रेणीतील कार्यकर्त्यांना ‘मिसा’खाली अटक झाली होती. परंतु, दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरुद्ध जे राजकीय पक्ष होते, त्यांना एकत्र केले आणि आश्चर्य म्हणजे, सर्व पक्ष एकत्र आले, हेच पहिले यश होते.
मी त्यावेळी नुकतीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडली गेले होते. अनिरुद्ध देशपांडे सर आम्हाला महाविद्यालयात शिकवायला होते. त्यांच्यावर अभाविपची जबाबदारी होती. एक दिवस त्यांनी आम्हा पाच-सहा जणांची बैठक घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात पुणतांबेकर सर यांच्याकडे बैठक झाली. त्यात आणीबाणीविषयक सविस्तर माहिती आम्हाला देशपांडे सर यांनी दिली. त्यांनी आम्हाला विचारले, “आपले नेते सोडविण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?” उत्स्फूर्तपणे मी म्हणाले, “सत्याग्रह करायला पाहिजे.” माझे उत्तर समाधानकारक होते, असे त्यांच्या चेहर्यावरून दिसले. आधी सर्व ठरले होते, पण आम्ही अनभिज्ञ होतो. त्यांना अपेक्षित उत्तर आल्याने सरांच्या चेहर्यावर समाधान होते.
मग तीन-चार बैठका होऊन नियोजन ठरले. आम्ही मुकुंदराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली बीएमसीसीमधून दि. ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजता सत्याग्रह करायचा आणि अटक करवून घ्यायची असे ठरले. त्याप्रमाणे मी घरी काहीही न सांगता, सत्याग्रहात भाग घेतला. आम्ही नऊजण होतो - तीन मुली आणि सहा मुले. पोलिसांच्या गाडीतून जातानासुद्धा आम्ही जोरजोरात घोषणा दिल्या. घरी काय झाले असेल, हा विचारही मनात आला नाही. डेक्कन पोलीस चौकीत दुपारी २ वाजता भाकरी आणि सालासकट लाल भोपळ्यांची भाजी हातावर घेऊन खाल्ली. तेव्हा खरी वास्तवाची जाणीव झाली. पण, आपण काही वाईट काम केले, असे कदापि वाटले नाही. मग कोर्टात कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर संध्याकाळी आम्हाला जेलमध्ये पाठविण्यात आले
.
माझ्या घरी तंग वातावरण होते. वडील सरकारी नोकरीत असल्याने पोलिसांनी त्यांची कसून चौकशी चालविली होती. त्यांची नोकरी जाण्याची वेळ आली होती. त्यांनी लिहून दिले की, ‘माझी मुलगी माझ्या घरात राहत नव्हती.’ तेव्हा कुठे त्यांची नोकरी टिकली.त्यांनी माझे रेशनकार्डवरील नावसुद्धा काढून टाकले. (त्याकाळी रेशनकार्ड पुरावा म्हणून खूप महत्त्वाचे होते.) आम्हाला अडीच महिन्यांची शिक्षा झाली. देशभरातून लाखो नागरिकांनी सत्याग्रह केल्याने तुरुंग कमी पडू लागले. कैद्यांना खायला घालण्याचा खर्चही सरकारला परवडेना.अन्नाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता.
१९७७च्या मार्च महिन्यात आणीबाणी उठविली. सर्व नेत्यांची सुटका झाली. दि. २६ जून १९७५ ते दि. १२ मार्च १९७७ अशी ही आणीबाणी हा इतिहासातील अत्यंत काळा कालखंडच!