नवी दिल्ली : अमेरिकेच्या ‘जीई एरोस्पेस’ने भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार करण्यासाठी भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) सामंजस्य करार करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ‘एफ ४१४’ इंजिनांच्या भारतातील संयुक्त उत्पादनाचा समावेश आहे. ‘जीई एरोस्पेस’ने त्याविषयी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ‘स्टेट व्हिजीट’मध्ये भारतीय हवाई दलासाठी लढाऊ जेट इंजिन तयार करण्याचा करार करण्यात आला आहे. ही घटना दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आवश्यक निर्यात अधिकृतता प्राप्त करण्यासाठी ते अमेरिकी सरकारसोबत काम सुरू असल्याचे जीई एरोस्पेसने म्हटले आहे.
भारत आणि एचएएलसोबतच्या दीर्घकालीन भागिदारीमुळे हा ऐतिहासिक करार शक्य झाल्याचे जीई एरोस्पेसचे अध्यक्ष आणि सीईओ एच. लॉरेन्स कल्प, ज्युनियर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्या दोन्ही राष्ट्रांमधील समन्वय साधण्याच्या दृष्टीकोनामध्ये मोलाची भूमिका बजाविता आल्याचा अभिमान असल्याचे तक्यांनी म्हटले आहे. जीई एरोस्पेसची ‘एफ ४१४’ इंजिने अतुलनीय असून दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा फायदे प्रदान करणारे ठरतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
जीई एरोस्पेस भारतात चार दशकांहून अधिक काळ इंजिन, एव्हीओनिक्स, सेवा, अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग या उद्योगांमध्ये व्यापक सहभागासह कार्यरत आहे. भारताच्या एचएएल आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसोबत जीईने १९८६ सालापासून ‘एफ ४०४’ इंजिनांसह लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या (एलसीए) विकासासाठी पाठिंबा देण्यास प्रारंभ केला होता. त्यानंतर जीई एरोस्पेसचे एफ ४०४ आणि एफ ४१४ इंजिने ‘एलसीए एमके १’ आणि ‘एलसीए एमके २’ च्या विकास आणि उत्पादनाचा भाग आहे. आतापर्यंत एकूण ७५ ‘एफ ४०४’ इंजिने वितरित केली गेली आहेत. त्याचप्रमाणे ‘एलसीए एमके१’साठी ९९ तर ‘एलसीए एमके२’ साठी आठ ‘एफ ४१४’ इंजिने वितरित करण्यात आली आहेत. आजच्या करारामुळे भारतीय हवाई दलाच्या ‘एलसीए एमके२’ साठी ९९ इंजिने तयार करण्यास बळकटी मिळणार असल्याचेही जीई एरोस्पेसने म्हटले आहे.